मुंब्रा : ठाण्यातील मॉडेला चेकनाक्यापासून थेट घोडबंदर रोडवरील गायमुखपर्यंत एमएमआरडीएकडून ‘वडाळा-घाटकोपर-कासारवडवली’ या मेट्रो-४ मार्गिकेवर ‘ट्रायल रन’ सुरू आहेत. आता या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे असून, ‘मॉडेला चेकनाका ते तीन हात नाका’ या मार्गिकेवर मेट्रो रेल्वेचे डबे रुळांवर चढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे या पट्ट्यात वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रात्रीच्या सत्रात मॉडेला चेकनाका ते तीन हात नाका भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-४ अ’च्या गाड्यांच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायमुख स्थानकात दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत या मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली आणि विजय गार्डन स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरील मेट्रो कामाच्या कासवगतीचा मुद्दा समोर आला. वर्ष उलटूनही या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू झालेली नसल्याने गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते.
अखेर या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्याला गती मिळाली असून, डबे रुळांवर चढवण्याचे काम पूर्ण होताच प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. ठाणे शहरातून दररोज लाखो नोकरदार मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने किंवा रस्तेमार्गे मुंबई गाठतात. या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ही मेट्रो सेवा उपयुक्त ठरणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ठाणे शहरातील काही स्थानकांवर ही मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पर्यायी मार्गिकेवरून वाहतूक
मुंबई आणि वागळे इस्टेट येथील मार्ग क्रमांक १६ वरून मॉडेला चेकनाकामार्गे तीन हात नाका जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मॉडेला चेकनाका येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी विरुद्ध दिशेच्या मार्गावर अतिरिक्त वाहिनी तयार करण्यात आली असून, या पर्यायी मार्गिकेवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे.
कोंडी टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने मार्गिका
मॉडेला चेकनाका ते तीन हात नाका मार्गावर मेट्रोचे डबे रुळांवर चढविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी मॉडेला चेकनाका परिसरातील भारत पेट्रोल पंपाजवळ मेट्रोचे डबे रुळांवर आणले जाणार आहेत. या कामासाठी एमएमआरडीएने ठाणे वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या कामाला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारपासून रात्रीच्या वेळेत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.