Thane Mental Hospital Pudhari
ठाणे

Thane Mental Hospital: रुग्ण बरे झाले, मात्र नात्यांची दारे उघडलीच नाहीत; 30 ते 40 वर्षे भेटीच्या प्रतीक्षेत

350 रुग्ण पुनर्वसन केंद्रात

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण सोनावणे

ठाणे: मानसिक आजारावर उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाल्यानंतर आपले नातेवाईक आपल्याला घरी घेऊन जातील या आशेवर मनोरुग्णालयाच्या चार भितींमध्ये 30 ते 40 वर्ष काढली. मात्र एवढ्या वर्षात आमचा रुग्ण बरा झाला का अशी साधी विचारपूस करायला सुद्धा कोणी आले नाहीत.

एवढे वर्ष रुग्णालयात राहिल्यानंतर काहींना त्यांचा घरचा पत्ताही आठवेना, बरे झाल्याने नवीन कायद्याप्रमाणे रुग्णालयात ठेवता येत नाहीत, तर नातेवाईकही घेऊन जात नाहीत, त्यामुळे इच्छा नसताना पुढचे आयुष्य आता या सर्वाना पुनर्वसन केंद्रात व्यथित करावे लागणार आहे. राज्याच्या विविध भागातून ठाणे मनोरुग्णालयात दाखल होऊन बरे झालेल्या 350 मनोरुग्णांची मन हेलाहून टाकणारी ही व्यथा आहे.

राज्याच्या विविध भागातून ठाणे मनोरुग्णालयात मनोरुग्ण हे उपचार घेण्यासाठी येत असतात. आजच्या घडीला या रुग्णालयात 650 पेक्षा अधिक मनोरुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेक रुग्ण बरे होऊनही 30 ते 40 वर्ष मनोरुग्णालयाच्या या चार भिंतींमध्ये अडकून पडले होते.

यामध्ये अनेक जणांचे नातेवाई त्यांना घरी घेऊन जाण्यास तयार नाहीत तर अनेक नातेवाईकांचे पत्ते बदलेले आहेत. रुग्णालय प्रशासन समाजसेवक आणि पोलिसांच्या माध्यमातून रुग्णांचे नातेवाईक शोधून त्यांना घरी पाठवण्याचा किंवा पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत असते.

मात्र आपल्या रुग्णाला घरी घेऊन जाण्याची मानसिकताच नातेवाईकांची नसल्याने इच्छा असूनही बरे झालेल्या रुग्णांना कुटुंबात राहता येत नाही. दिवाळीसारख्या सणांमध्ये तर या रुग्णांचे नातेवाईकांकडे अक्षरशः डोळे लागलेले असतात. मात्र प्रत्येक वर्षी त्यांच्या पदरी निराशाच येते.

मग अशावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीच त्यांचे नातेवाईक बनतात. बरे होऊनही 40 वर्ष रुग्णालयातच असलेल्या आणि नातेवाईकांनी नाकारलेल्या 350 जणांना 2021 ते 2026 या कालावधीत पुनर्वसन केंद्रात जावे लागले आहे. 30 ते 40 वर्ष मनोरुग्णालयाच्या भिंतींमध्ये काढल्यानंतर कुटुंबाच्या भिंतींमध्ये राहायला मिळेल या आशेवर असलेल्या या सर्वाना आता पुनर्वसन केंद्रातच आयुष्य घालवावे लागणार आहे.

मनोरुग्णालयात दररोज रुग्णांच्या रांगा बदलती जीवनशैली विविध मानसिक आजार आणि एकाकीपणा तसेच समन्वयाचा अभाव यामुळे दिवसेंदिवस मनोरुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. इतर रुग्णालयाप्रमाणे मनोरुग्णालयातही दररोज रुग्णांच्या रांगा लागू लागले आहेत. आता सरासरी दररोज अडीचशे ते तीनशे रुंगांची नोंद होत आहे. सध्या ठाण्याच्या मनोरुग्णलायत 667 रुग्ण भरती होऊन उपचार घेत आहेत. त्यात सर्वात मोठा टक्का पुरुषांचा म्हणजे 413 आहे.

नवीन कायदा काय सांगतो?

रुग्ण आणून हॉस्पिटलला सोडला की तो तिथेच जगणार तिथेच मरणार परत त्याची कोण फिर्याद घेत नसेल हा प्रकारही आता कायद्याने मोडीत निघाला असून इतर दवाखान्यांमध्ये जशी उपचार चालतात तशाच पद्धतीचे उपचार करून रुग्ण नातेवाईकांना लगेच घरी पाठवला जातो तसेच कोणी सांगितले म्हणून तो रुग्ण आहे असेही ठरत नाही, त्यासाठी मनोरुग्णालय ते कोर्ट असा खटाटोप करावा लागतो. रुग्णाचा आढावा घेण्यासाठी मानसिक आरोग्य आढावा मंडळाची देखील स्थापना केली आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, मानसिक आजार बरा झाल्यानंतरही समाजातील गैरसमज, भीती, लाज आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबे रुग्णांना परत स्वीकारण्यास तयार नसतात. त्यामुळे बरे झालेले रुग्ण रुग्णालयामध्येच राहतात.

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, “औषधोपचार आणि समुपदेशनामुळे अनेक रुग्ण सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम होतात. मात्र समाजातील कलंक आणि नातेवाईकांचा नकार ही मोठी समस्या आहे.” अनेक वेळा नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र पत्ते बदललेले असतात किंवा कुटुंबीय संपर्क टाळतात. काही रुग्णांना स्वतःचे गाव किंवा नातेवाईकही आठवत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT