ठाणे : विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या; तिघांना अटक File Photo
ठाणे

ठाणे : विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या; तिघांना अटक

घरगुती वाद झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून महिला रात्री मंदिरात थांबली हाेती

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

घरगुती वाद झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून मंदिरात रात्री थांबलेल्या (30 वर्षीय) विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघा नराधमांना डायघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (वय 62, कोटा, राजस्थान), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45, प्रतापगड, यूपी), राजकुमार रामफेर पांडे (54, प्रतापगड, यूपी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अटक संशयीत आरोपी मंदिरात सेवेकरी म्हणून काम करतात अशी माहिती पोलिसांनी दिली.

डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या मागे एका अज्ञात महिलेचा मृतदेह 9 जुलै 2024 रोजी आढळून आला होता. मृत महिलेच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात महिलेची माहिती घेतली, तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात महिला मिसिंगची फिर्याद दाखल आहे का याची माहिती मिळवली. त्यात नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्यात बेलापूर येथील विवाहिता मिसिंग असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत मिसिंग विवाहित व मृत महिला एकच असल्याचे स्पष्ट झाले. मृत महिलेची ओळख पटल्यानंतर डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन पथके बनवून आरोपींचा शोध सुरू केला.

घटनास्थळी असलेले फुटेज पडताळून बघितले असता घोळ गणपती मंदिर व गौशाला परिसरात सेवेकरी असलेल्या दोघांवर पोलिसांना संशय आला. डायघर पोलिसांनी संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा आणि राजकुमार रामफेर पांडे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघे व त्यांचा साथीदार श्यामसुंदर प्यारचंद शर्मा या तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी मंदिरात थांबलेल्या विवाहितेला गुंगीचे पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेस शुद्ध आल्यावर आरडाओरडा केल्यामुळे तिला मंदिरामागील बाजूस खोल दरीत नेऊन तिची हत्या केली अशी माहिती डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली. पोलिसांनी तिसरा संशयीत आरोपी शर्मा यास मुंबईतून अटक केली आहे.

घरातल्या वादामुळे मंदिरात थांबली होती विवाहिता

नवी मुंबईच्या बेलापूर गावात राहणाऱ्या विवाहितेचा घरगुती वादविवाद झाला होता. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिळगाव येथील घोळ गणपती मंदिरात विवाहिता आली होती. दिवसभर मंदिरात थांबल्यानंतर ती रात्री घरी परत न जाता मंदिरातच थांबली होती. त्याचवेळी मंदिरात सेवेकरी असलेले तीन व्यक्ती देखील होते. या तिघांनी महिलेस चहा पिण्यास दिला. त्यात त्यांनी भांगेच्या गोळ्या मिसळून दिल्या होत्या. महिला नशेत असतांना तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास महिलेस शुद्ध आल्यावर तिने आरडाओरडा केला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघा नराधमांनी तिला मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून व गळा दाबून तिची हत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT