Thane | जिल्ह्यात खतांचा काळाबाजार उघड

डहाणूत युरिया खताचा साठा जप्त; माकपच्या मदतीने कृषी विभागाची कारवाई
palghar
माकप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने केलेल्या या कारवाईत 60 पोती जप्त करण्यात आली pudhari news network
कासा : निलेश कासट

गेल्या काही दिवसात राज्यासह पालघर जिल्ह्यात खते, बी बियाणांचा काळाबाजार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचे प्रमाण वाढतच असून पालघर जिह्यातील डहाणू तालुक्यात गंजाड, मणिपूरमध्ये युरियाचा काळाबाजार उघडकीस आला आहे. माकप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने केलेल्या या कारवाईत 60 पोती जप्त करण्यात आली आहेत.

पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीकामांना वेग आला असून शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या खते बी बियाणे खरेदीत वाढ झाली आहे. मात्र याच सुमारास खतांचा काळाबाजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना युरियाची टंचाई जाणवत असते. युरियाला असलेली मागणी लक्षात घेऊन काही जणांकडून त्याची साठवणूक केली जाते. तर काहीजण काळ्याबाजारात युरियाची विक्री करत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांना युरिया मिळेनासा झाला असताना डहाणू तालुक्यात युरियाचा काळाबाजार माकपने उघड केला असून युरिया मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खत साठ्यांचे कनेक्शन भिवंडीत

बेकायदा खतांचा साठा सापडण्याचे प्रमाण पालघर जिल्ह्यामध्ये अधिक असून बोईसर एमआयडीसी तसेच इतर ठिकाणी अवैध युरिया खतसाठा सापडल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यानंतर आता युरिया खताचा बेकायदा साठा सापडल्यामुळे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात खतांचा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. गंजाड येथे सापडलेल्या खतांच्या साठ्याचे कनेक्शन भिवंडीत असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. भिवंडी वरून बेकायदेशीररित्या हा खतांचा साठा पालघर जिल्ह्यात आणला जातो अशी ही दबकी चर्चा आहे.

या अगोदर ही युरिया खताची साठवणूक करून इतर ठिकाणी पाठवला होता का? याची ही चौकशी होणे गरजेचे आहे. गंजाड येथील युरिया चा साठा एका गोदामात साठा करून ठेवल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाला देताच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने कारवाई केली.

मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत घोरखना, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश भुरभुरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी सापळा रचत ही घटना उघड केली आहे. त्यांच्या सतर्कतेमुळेच युरियाचा काळाबाजार उघड झाला आहे. म्हणून स्थानिक शेतकर्‍यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. कृषी विभागाने पुढील तपासणीसाठी सॅम्पल घेतले असून, जिल्हा कृषी अधिकार्‍यांकडून तपास सुरू केला असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

खताची कृत्रिम टंचाई

जिल्ह्यात गेल्या एकमहिन्यापासून युरिया खत उपलब्ध होत नसून खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्ह्यात पावसाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा अशा सूचना काही दिवसापूर्वी कृषीमंत्र्यांनी दिल्या होत्या मात्र पालघर जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून खतांचा काळाबाजार सुरू आहे. ऐन मुख्य हंगामात शेतकर्‍यांना युरियापासून वंचित राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कठोर पावले उचलणे गरजेचे

जिल्ह्यात यंदा उशिरा पेरणी सुरू झाली आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात पाऊस दडी मारून बसला असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. खरीप पिकांची निगा राखण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागले असताना. दुसरीकडे मात्र शेतकर्‍यांना युरियाच्या कृत्रिम टंचाईचा देखील सामना करावा लागत आहे. सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कृषी अधिकार्‍यांनी गंजाड येथील गोदामात ठेवलेला युरिया ताब्यात घेतला असून पुढील तपास करून डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

निलेश भागलेश्वर, कृषी अधीक्षक, पालघर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news