प्रवीण सोनावणे
ठाणे: ठाण्यात दोन शिवसेनेमध्ये पूर्णेकर प्रकरणावरून संघर्ष विकोपाला गेला असताना ठाणे कोपरी येथील शिवसेना शाखेत एकाचवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावले गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही शिवसेनेचे एकच कार्यालय असल्याची चर्चाही यावेळी रंगली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला व शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव असलेल्या कोपरीतच पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.
चेंदणी कोळीवाड्यातील एका कार्यक्रमानिमित्त कोपरीच्या शिवसेना शाखेत गेलेल्या खा. शिंदे यांना शाखेतील उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहून संताप अनावर झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रसंगानंतर खा. नरेश म्हस्के यांनाही या नाराजीचे चटके बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोपरीतील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोमवारी रात्री खा. डॉ. श्रीकांत शिंदे चेंदणी कोळीवाड्यात एका कार्यक्रमासाठी आले होते.
त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना गराडा घालत आग्रहाने कोपरीतील शिवसेना शाखेत नेले. मात्र, शाखेत प्रवेश करताच भिंतीवर एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राशेजारी उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र पाहून खा. शिंदे नाराज झाल्याचे समजते.
त्यानंतर शाखेतील पदाधिकारी व उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी जाब विचारल्याची चर्चा आहे. या प्रसंगामुळे शाखेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. खा. शिंदे यांनी तेथून तडक बाहेर पडल्याचेही सांगितले जाते. यावेळी उपस्थित खा. म्हस्के यांनाही या नाराजीचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात शाखा व स्थानिक संघटनांवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला.
ठाण्यातील कोपरीही त्याला अपवाद नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून या शाखेवरून दोन्ही गटांत संघर्ष सुरू असल्याची पार्श्वभूमी आहे. मात्र, अपेक्षित राजकीय ताकद उभी करता न आल्याने शिंदे गटाला या शाखेत उद्धव ठाकरे गटासोबतच सहअस्तित्वाची तडजोड करावी लागल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जाते. परिणामी, एकाच शाखेत दोन्ही गटांचे नेते व कार्यकर्ते आपापली उपस्थिती दाखवत असल्याचे चित्र निर्माण झाले.
नाराज शिवसैनिक वेगळी भूमिका घेण्याची शक्यता?
कोपरीतील शिवसेनेमधील नाराजी आता निर्णायक वळणावर पोहोचल्याची चर्चा आहे. येत्या रविवारी काही नाराज शिवसैनिक वेगळी भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोपरीत राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नेतृत्व या नाराजांची समजूत काढणार की शाखेचा वाद कायमचा मिटवण्यासाठी निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाराज कार्यकर्ते पक्षातच राहणार की शेजारच्या भाजपचा पर्याय स्वीकारणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. कोपरीतील शिवसेनेचा हा अंतर्गत संघर्ष केवळ एका शाखेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो पक्षातील नेतृत्व, स्थानिक वर्चस्व, जुन्या-नव्यांचा संघर्ष व कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या संभाव्य घडामोडींकडे केवळ कोपरीच नव्हे, तर ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.