ठाणे : ठाण्याच्या कोपरी पूर्व परिसरात पालिका प्रशासनाच्या बीएसयुपी योजनेच्या इमारतीतील अष्टविनायक सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावरून अचानक लिप्ट कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. दरम्यान लिप्टमध्ये गर्भवती महिला व काही लहान मुले होती. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर गर्भवती महिलेला उपचारासाठी पालिकेच्या कोपरीतील प्रसूतिगृहात दाखल केले. महिलेचा धोका टळल्याची सूत्रांनी माहिती दिली.
ठाण्याच्या पूर्व परिसरातील कोपरीच्या सिद्धार्थनगर येथील बीएसयुपी योजनेची 7 मजली इमारत आहे. अष्टविनायक सोसायटीच्या इमारतीची लिप्ट शनिवारी दुपारी कोसळली. शनिवारी दुपारी लिप्ट मध्ये गर्भवती महिला आणि काही मुले चढली. लिप्ट सुरु होताच अचानक लिप्ट तळ मजल्यावर आदळली. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी अडकलेल्यांची सुटका केली.
या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि रहिवाशांना धीर दिला. ठाणे महानगरपालिकेच्या बी एस यु पी योजनेच्या अष्टविनायक सोसायटी ही इमारत सात माळ्याची इमारत असून या इमारतीत एकूण 80 रहिवाशी राहत आहेत.
दरम्यान सोसायटीची लिफ्ट ही अडकत अडकत चालत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र याकडे ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडे लिप्ट दुरुस्ती करिता निधी नसल्याचे सांगितल्याचा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांनी केला आहे.
पालिकेच्या बीएसयुपी योजनेची इमारत निर्माण करताना हेळसांड झाल्याचा आरोपही करण्यात येत असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात ग्रस्त लिफ्ट ची मोटार 35 वर्षे जुनी असल्याचे नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहे. तर या प्रकाराबाबत आणि बीएसयुपी योजनेच्या इमारतींची खालवलेली परिस्थिती पाहता लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे रहिवासी आणि स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे.