Atgaon railway bridge collapse worker killed
कसारा : आटगाव रेल्वे स्थानकावर जीर्ण झालेल्या पुलाचा सांगाडा तोडण्याच्या कामादरम्यान हा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक कामगार ठार झाला. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि.१२) रात्री ही दुर्दैवी घटना घडली.
शुक्रवारी रात्री नऊ वाजता आटगाव रेल्वे स्थानकावरील जीर्ण झालेल्या पुलाचा सांगाडा तोडण्याचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले होते. काम सुरू असताना अचानक रेल्वे पुलाचा सांगाडा पत्त्यासारखा कोसळला. यादरम्यान, पुलाखाली काम करत असलेले दोन कर्मचारी लोखंडी पोलाखाली दाबले गेले. त्यात एक कर्मचारी बचाव पथकाने गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढला, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा अंगावर मोठा लोखंडी खांब पडून तो जागीच ठार झाला.
आटगाव रेल्वे स्थानकावर नवीन दोन पूल तयार करण्यात आले होते. त्यानंतर जुन्या पूलाचा एक भाग अर्ध्या वर्षापूर्वी तोडण्यात आला होता, तर अर्धा भाग तसेच ठेवण्यात आलेला होता. फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन दरम्यान असलेला जीर्ण झालेला लोखंडी पूल मोठा धोका निर्माण करत होता. रेल्वे प्रशासनाने या पुलाचा अर्धा भाग तोडण्यासाठी ठेकेदार कंपनीला आदेश दिले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ठेकेदार कंपनीने उर्वरित जीर्ण पुलाचा सांगाडा तोडण्याचे काम सुरू केले. मात्र, काम करत असताना सुरक्षा व्यवस्थेची योग्य काळजी न घेतल्याने हा पूल अचानक कोसळला.
सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस, आर. पी. एफ., रेल्वे बचाव पथक, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि शहापूर व कसारा पोलिस घटनास्थळी धावले आणि मदत कार्य सुरू केले.
गंभीर जखमी असलेल्या कामगाराला आपत्ती व्यवस्थापन टीमने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या कामगाराचा, पवनकुमार सिंग (रा. हरयाणा) अंगावर जास्त वजनाचे लोखंडी पोल पडल्याने तो जागीच ठार झाला.
घटनेच्या तपासासाठी रात्री तहसीलदार परमेश्वर कासुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी सांगितले की, रेल्वे पुलाच्या दुर्घटनेबद्दल दोषी ठेकेदारावर कडक कारवाई केली जाईल.
आश्वासन देण्यात आले की, आटगाव रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबई कडे जाणारी किंवा कसारा दिशेने येणारी कोणतीही लोकल अथवा मेल एक्सप्रेस नसल्यामुळे मोठा धोका टळला.
आटगाव रेल्वे स्थानकावर जीर्ण झालेल्या पुलाच्या सांगाड्यामुळे धोका निर्माण होत होता. रेल्वे प्रशासन आणि ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या पुलाचा सांगाडा तोडण्यात उशीर झाला. नवीन पूल तयार झाल्यानंतरच तो काढला असता, तर ही दुर्घटना टाळता आली असती. रात्री कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याचा मलबा रेल्वे प्रशासनाने काढून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले.