अनिकेत जगताप, श्रुती पवार Pudhari
ठाणे

Kalyan Crime | कल्याण हादरले ! प्रेमविवाहाचा करूण अंत: पतीपाठोपाठ पत्नीनेही गळफास घेऊन जीवन संपविले

कल्याणमध्ये राहणाऱ्या श्रुती पवार हिने दीड वर्षांपूर्वी मालेगावच्या अनिकेत जगताप याच्याशी प्रेमविवाह केला होता

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Couple Death case

डोंबिवली : कल्याणात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून दीड वर्षांपूर्वी थाटलेला संसार सासरच्या जाचाला कंटाळून उध्वस्त झाला. मालेगावच्या अनिकेत जगताप या तरूणासोबत प्रेमविवाह केलेल्या कल्याणच्या श्रुती पवार हिने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. विशेष म्हणजे श्रुतीच्या मृत्यूच्या अवघे काही दिवस आधी तिचा पती अनिकेत यानेही गळफास घेऊन जीवन संपवले होते. या दुहेरी मृत्यूकांडाने कल्याण शहर सुन्न झाले आहे.

फक्त दोन महिन्यांचेच सुख

कल्याणमध्ये राहणाऱ्या श्रुती पवार हिने दीड वर्षांपूर्वी मालेगावच्या अनिकेत जगताप याच्याशी प्रेमविवाह केला होता. घरच्यांचा विरोध पत्करून श्रुतीने प्रेमासाठी संसार थाटला. मात्र लग्नानंतरचे अवघे दोन महिनेच सुखाचे गेले. त्यानंतर सासू, सासरे, नणंद आणि दीर राहूल जगताप याच्याकडून श्रुतीला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिचा छळ करण्यास सुरूवात झाली. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून श्रुतीला घरातून हाकलून देण्यात आले. पती अनिकेत देखील श्रुतीला होणाऱ्या जाचाकडे दुर्लक्ष करत होता. जाच असह्य झाल्याने श्रुती कल्याण जवळच्या शहाड परिसरात राहणाऱ्या आपल्या मामीकडे येऊन राहू लागली.

पतीच्या मृत्यूनंतर श्रुतीच्या आयुष्यातील संकटांची मालिका आणखी गडद

सासरच्या छळाला कंटाळून श्रुतीने अखेर महिला तक्रार केंद्रामध्ये धाव घेतली. २५ तारखेला झालेल्या सुनावणीत तिने मला पतीसोबत राहायचे नाही, असे स्पष्ट सांगितले. मात्र, या सुनावणीनंतर त्याच सायंकाळी पती अनिकेत याने गळफास घेऊन जीवन संपविले. पतीच्या मृत्यूनंतर श्रुतीच्या आयुष्यातील संकटांची मालिका आणखी गडद झाली.

आई-वडिलांना अटक अन् समाज माध्यमांवर ट्रोलिंग

अनिकेतच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींनी श्रुतीसह तिचे आई-वडील आणि मामीवर पती अनिकेतला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपासह चोरीची खोटी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून २८ तारखेला श्रुतीच्या निष्पाप आई-वडिलांना मालेगाव येथून अटक केली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार श्रुतीच्या आई-वडिलांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. एकीकडे आई-वडील जेलमध्ये गेले.

तर दुसरीकडे श्रुतीने अटकपूर्व जामिनाकरिता न्यायालयात धाव घेत होती. मात्र, याच काळात वटपौर्णिमेच्या दिवशी ‘पत्नीनेच पतीचा जीव घेतला’ अशा खोट्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्या. दीर राहूल जगताप याच्याकडून श्रुतीवर वारंवार मानसिक दबाव आणला जात होता.

सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा

चौफेर कोंडी झालेल्या श्रुतीने अखेर राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. त्यापूर्वी श्रुतीने एक सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये तिने सासरच्या लोकांकडून झालेल्या क्रूरतेची कहाणी मांडली आहे. माझ्या मृत्यूनंतर दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि जेलमध्ये असलेल्या माझ्या निष्पाप व आजारी आई-वडिलांची सुटका करण्यात यावी, अशी आर्त हाक मारली आहे. तसेच माझा अंत्यसंस्कार पती अनिकेतसोबतच करावा, अशी काळीज पिळवटून टाकणारी इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

नातेवाईकांचा संताप अन् पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर श्रुतीच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन प्रचंड गोंधळ घातला. या साऱ्या अप्रिय घटनांना जबाबदार असलेल्या राहूल जगतापसह सासरच्या इतर मंडळींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी श्रुतीच्या नातेवाईकांनी केली आहे.

या प्रकरणी एकीकडे कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, श्रुतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिक तपास करत आहेत. तर दुसरीकडे एका प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी आणि करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT