Kalyan Crime : कल्याणात धुणी-भांडी करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण; हप्ता वसुलीच्या बहाण्याने अश्लील कृत्य

Woman Harassment Case
Woman Harassment CasePudhari
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणमध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाचा हप्ता वसूल करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून, धुणी-भांडी करणाऱ्या एका महिलेला बेदम मारहाण करत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील मिलिंदनगर परिसरात राहणारी पीडित महिला धुणी-भांडी करून आपला उदरनिर्वाह करते. तिला एक मोबाईल खरेदी करायचा होता, मात्र स्वतःच्या नावाने कर्ज मिळत नसल्याने तिने तिच्या मैत्रिणीच्या पतीच्या नावाने कर्ज काढून मोबाईल विकत घेतला होता.

या कर्जाचा पहिला हप्ता तिने वेळेत भरला होता. मात्र, दुसरा हप्ता भरण्यासाठी एका महिलेने तिला आपल्या मुलीच्या हाती निरोप पाठवून घरी बोलावून घेतले. त्यानुसार पीडित महिला संबंधित घरी गेली असता, तिथे आधीपासूनच सुजित जाधव आणि संकेश शिंदे हे दोघे दबा धरून बसले होते.

लाथा-बुक्क्यांनी मारहाण आणि अश्लील कृत्य

पीडित महिला घरात प्रवेश करताच सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांनी तिला गाठले. काही समजण्याच्या आतच दोघांनी तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिलेचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांनी तिच्याशी अश्लील कृत्य केले आणि 'याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारू', अशी धमकी दिली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल

या अनपेक्षित प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड हादरली होती. मात्र, तिने हिंमत न हारता थेट खडकपाडा पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news