

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण स्टेशन परिसरातून कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून बंद घरात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अख्तर मणियार (६०) वसलीम शेख (६२) असे या नराधमांचे नाव असून. नागरिकांच्या सर्तकतेमूळे या दोन नराधमांना पकडण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कोळसेवाडीतील एका बंद घरातून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीच्या रडण्यासह आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना जाग आली. त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता मुलीने दोघांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्या दोन्ही सैतानांना तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत मुलगी कचरा संकलनाचे काम करते. आपल्यावर बेतलेल्या भयंकर प्रसंगानंतर तिने स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर पिडीत मुलीच्या जबानीवरून पोलिसांनी या दोन्ही नराधमांविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना समाजात जागा नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा जलद तपास करून हा खटला जलदगती न्यायालयात सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकजण एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो, तर दुसरा रिक्षा चालक आहे. घटनास्थळी असलेले घर भाड्याने देण्यात आले होते. पिडीत मुलगी सध्या सुरक्षित असून तिला वैद्यकीय तपासणी व समुपदेशन सहाय्य देण्यात आले आहे. पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवरील गुन्हे जलद गतीने चालविण्याची तरतूद आहे. पोलिस आता आरोपींचा पूर्वीचा रेकॉर्ड आणि या प्रकरणात इतर अन्य कुणी सामील आहे का ? याचा तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर कल्याण पूर्व परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील रहिवाशांसह महिला संघटनांनी या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.