ठाणे : ठाणे, घोडबंदर रोड, मुंब्रा, दिवा भागात अनियमित पाणी पुरवठा होत असून अनेक वर्षांपासून पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम रखडलेले आहे. वर्षानुवर्षे पाणी प्रश्न कायम आहे. त्याचा फटका करदात्या नागरिकांना बसत आहे. त्याचे पडसाद आज झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटून अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाणी विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. तर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत तीन वर्ष आराम केलेत, आता कामाला लागा! असे बजावत पाणी पुरवठा अधिकारी सभागृहाला चुकीची माहिती, असमाधानकारक उत्तर देत असल्याने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत शिवसेनेच्या नगरसेविका यज्ञा भोईर यांनी प्रभागातील पाण्याच्या टाकीच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करून पाणी प्रश्नाला वाचा फोडली. त्यावेळी पाणी पुरवठ्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी पंधरा दिवसात टाकीतून पाणी पुरवठा सुरु केला जाईल, असे उत्तर दिले.
त्यावेळी संतप्त झालेल्या भोईर यांनी पंधरा दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत असेच उत्तर दिल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर अन्य नगरसेवकांनी आपआपल्या परब प्रभागातील पाणी प्रश्न आणि अर्थवट राहिलेल्या कामांबाबत जाब विचारला. मुंब्र्यातील साडे चार लोक संख्येला फक्त एकच टँकर असून भूमीपूजन होऊन चार वर्ष उलटली तरी टाकीचे काम सुरु झाले नाही, पाणी नियमित मिळत नसल्याबाबत मुंब्र्यातील नगरसेविकांनी आवाज उठविला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते अभिजित पवार यांनी पालिकेच्या एकूण उपलब्ध पाणीसाठा आणि वितरणाबाबत प्रशासनाला धारेवर धरले. विरोधी पक्ष नेता शानू पठाण यांनी नाराजी व्यक्त केली. तर सभागृहनेते हणमंत जगदाळे यांनी पाणी विभागाचा भोंगळ कारभार कसा आहे, हे सांगत 1992 पासून त्यांच्या प्रभागातील पाणी प्रश्न कायम असल्याचे नमूद केले.
महापालिका क्षेत्रात 10 ते 15 मिनिटे पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा आणि वितरण व्यवस्था याचा ताळमेळ बसविण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे सांगत जगदाळे यांनी प्रभाग समितीनिहाय पाणी पुरवठ्याच्या बैठका घेऊन अहवाल तयार करण्याची सूचनाही केली.
सभागृहातील नगरसेवकांच्या पाणी पुरवठ्याबाबत असलेल्या तीव्र भावना लक्षात घेऊन संतप्त झालेल्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. अधिकारी हे नगरसेवकांच्या प्रश्नांना चुकीची उत्तर देत असून त्यांचे समाधान करीत नाहीत.
तीन वर्ष आराम केलात, आता कामाला लागा !
महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 20 दिवसांपूर्वी पाणी विभागाची बैठक घेऊन पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा असून त्याची तातडीने सोडवणूक करावी, नगरसेवकांना समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशा सूचना केल्या होत्या. तरी देखील अधिकारी पूर्णपणे चुकीची उत्तरे देत आहेत.
सभागृहात समाधानकारक उत्तरे देत नाही. तीन वर्ष आराम केलात आता कामाला लागा आणि ठाणेकरांना पाणी द्या, असे आदेशित करीत चुकीची आणि समाधानकारक उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे, असा इशारा दिला.