ठाणे: ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल-फुलांची उधळण करत वाजत-गाजत आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर आदी शहरात दीड हजाराहून अधिक सार्वजनिक ठिकाणी तर १ लाख ६५ हजार घरात खासगी गणपती मूर्तींची मनोभावे स्थापना होणार आहे. तसेच १ हजार ८५८ ठिकाणी गौरीची स्थापना करण्यात येणार आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झालेल्या गणेशभक्तांसह ठाणे पालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व पोलीस दलही सज्ज झाले आहेत. विसर्जन घाट, ठिकठिकाणी शहरात कृत्रिम तलावांची निर्मिती, गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे पालिकेने उभारली असून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह आयुक्तालय हद्दीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाणे पालिकेने शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. यासोबतच पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत.
या ठिकाणी छोट्या गणेशमूर्तींबरोबरच पाच फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशमूर्ती विसर्जनासाठी १९५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
त्यात ठाणे शहरात परिसरात ५५, भिवंडी ४१, कल्याण ५६ आणि उल्हासनगर विभागात ४३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. गणेशोत्सव काळात प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील सक्रिय राहणार असून पर्यावरण पूरक मूर्ती स्थापन करून पर्यावरणाचा समतोल राखून उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसाच्या सरी अन् वाहतूक कोंडी
बाप्पाच्या स्वागताचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने व त्यातल्या त्यात सुट्टी असल्याने रविवारी नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. शहरातील सर्व लहान-मोठ्या बाजारपेठा गर्दी व बाप्पाच्या आगमनाच्या साहित्यांनी फुलून गेल्या होत्या. हार, फुले, सजावटीचे साहित्य, मखर, पूजेचे साहित्य आदीची जोरदार आवक बाजारपेठांमध्ये झाली आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आगमनाचा उत्साह ओसंडून वाहत असतांनाच दुसरीकडे रविवारी सकाळपासून पावसाच्या सरींचे देखील शहरासह जिल्हाभरात आगमन झाले. या पावसामुळे खरेदी व साहित्य विक्रीवर काहीसा परिणाम दिसून आला. तर खरेदीसाठी झालेली गर्दी व त्यातच पावसाच्या कोसळणाऱ्या सरी यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. खरेदीसाठी घराबाहेर बाहेर पडलेले नागरिक वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.