Thane Ganesh Festival Permissions pudhari photo
ठाणे

Thane Ganesh Festival Permissions : बाप्पा येणार, पण परवानग्या कुठे? ३०० गणेश मंडळे वेटिंगवर!

बैठक उशिरा घेतल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महापौरांसमोरच नाराजी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : बाप्पाच्या आगमनाला अवघे २० दिवस शिल्लक असताना ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महापालिकेने बैठक उशिरा घेतल्याने शहरातील सुमारे ३०० गणेश मंडळांच्या विविध प्रशासकीय परवानग्या अद्याप प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे उत्सवाच्या तोंडावर परवानग्या मिळविण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ होणार असून, या विलंबाबद्दल मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासमोरच तीव्र नाराजी व्यक्त केली.

यंदा १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विविध प्रलंबित मागण्या, तसेच मंडप, वीज, वाहतूक, पोलिस आणि इतर प्रशासकीय परवानग्यांबाबत चर्चा करण्यासाठी दरवर्षी उत्सवाच्या साधारण महिनाभर आधी महापालिका मुख्यालयात बैठक घेतली जाते. मात्र, यंदा ही बैठक उशिराने झाल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दोन वेळा पत्र देऊनही महापौरांकडून बैठकीसाठी वेळ मिळत नसल्याची नाराजी मंडळांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने अधिसूचना काढून अखेर बैठकीचे आयोजन केले. त्यामुळे उशिरा का होईना, गणेश मंडळांच्या अडचणी आणि प्रलंबित परवानग्यांवर चर्चा करण्यासाठी प्रशासनाला पाऊल उचलावे लागले.

या बैठकीला महापालिका अधिकारी, पोलीस उपायुक्त, पोलीस सहायक पोलीस आयुक्त, एमएसईडीसीएल, टोरंट पॉवरचे अधिकारी तसेच ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंडळांच्या विविध मागण्या, परवानग्यांची प्रक्रिया आणि उत्सवाच्या काळातील प्रशासकीय समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली.

परवानग्यांसाठी मंडळांची धावपळ

गणेशोत्सवाच्या तयारीला शहरातील मंडळांनी आधीच सुरुवात केली आहे. मंडप उभारणी, सजावट, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपक, वाहतूक व्यवस्था आणि अन्य तयारीचे नियोजन मंडळांकडून सुरू आहे. मात्र, विविध विभागांच्या परवानग्या अद्याप प्रलंबित असल्याने मंडळांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उत्सवासाठी कमी कालावधी उरल्याने आता सर्व परवानग्या वेळेत मिळविण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. बैठक उशिरा झाल्याने निर्माण झालेला वेळेचा ताण प्रशासनाने कमी करावा आणि सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून गणेश मंडळांच्या परवानग्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT