ठाणे : भाजपचे देवेंद्र फडणवीस हे देवभाऊ नसून घेवा भाऊ, टक्का भाऊ, मेवा भाऊ असून अशा फसवनीसांचे ठाण्याचा दाढीवाला (शिंदे) आणि हैद्राबादचा (ओवेसी) दाढीवाला हे सहकारी आहेत. सातारा ड्रग प्रकरणात पकडण्यात आलेल्या 43 आरोपींपैकी 40 बांग्लादेशीय आरोपींना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव आणून सोडून द्यायला भाग पाडले, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन केला.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा देत 65 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्या काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रदेश अध्यक्ष सकपाळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सकपाळ यांनी नियोजनामधील चुकांमुळे 131 जागांवर उमेदवार उभे करता आले नाही, याची कबुली देत भाजपसोबत युती करणाऱ्या अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांवरील कारवाईतून राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना भाजपसोबत न जाण्याचा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपालिका निवडणुकीमध्ये तमाशगीर सरकारने पैसा फेक तमाशा देख हे वगनाट्य रंगवले तरी ही काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष निवडून आले. 76 ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तब्बल 1 हजार 6 नगरसेवक निवडून आले.
तब्बल अडीच हजार नगरसेवक दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे खास अभिनंदन करीत असल्याचे सकपाळ म्हणाले. राज्यात 29 महापालिका निवडणुका होत असून नांदेड, लातूर आणि मुंबई वंचित आघाडी सोबत लढत असून अन्य ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये लढत आहोत. ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहोत. आमचा महाविकास आघाडीमधील चर्चेच्या गुराळामुळे आम्ही बेसावध राहिलो आणि 131 ठिकाणी उमेदवारांना उभे करता आले नाही. काँग्रेसची ताकद नाही असे म्हणत असताना ठाण्यात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे सांगत सकपाळ यांनी आमच्या उमेदवारांना पैशाचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप केला.
निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पैशाचा स्रोत हे शासकीय योजनेतील भ्रष्ट्राचार आहे. समृद्धी महामार्गातून दोन हजार कोटी, ठाणे-बोरिवली बोगद्यातून चार हजार कोटी आणि अन्य योजनांमधील भ्रष्ट्राचारातून मिळालेला पैसा निवडणुकीत वापरला जात असल्याचा आरोप सकपाळ यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस हे देवभाऊ नसून घेवा भाऊ आहेत. ते भाजपमध्ये बलात्कारी, गुंड, भ्रष्ट्राचारी आणि अन्य पक्ष फोडून लोकांना घेत असून लहान मुलीच्या अत्याचारातील सहआरोपीना भाजपने नगरसेवक बनवले.
असे हे फडणवीस देवभाऊ नसून टक्कभाऊ, मेवा भाऊ असल्याची टीका केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा दाढीवाला असे म्हणत सातारा येथील ड्रग्जप्रकरणातील पकडलेल्या 40 आरोपींना सोडून देण्यास शिंदे पिता पुत्रांनी दबाव टाकल्याचा आरोप केला. मुंबई पोलिसांनी 43 आरोपींना अटक केली असताना 40 बांग्लादेशीय आरोपींना दबाव टाकून सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकांची नावे मतदान पत्रिकेवर टाकावीत अशी मागणी काँग्रेसने केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सुभाष कानडे, राजेश जाधव यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.