

Meenakshi Shinde Viral Audio Clip
ठाणे : राजीनामा, बंडखोरीमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असताना शिवसेना उमेदवार मीनाक्षी शिंदे यांचे फोनवरील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाले आहे. या संभाषणात आगरी समाजाबाबत अपमानास्पद शब्द वापरल्याने संतप्त झालेले खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह उबाठाच्या आगरी उमेदवारांकडून पत्रकार परिषदा घेऊन जाहीर निषेध केला जात आहे.
तर दुसरीकडे हे संभाषण मोर्प असून विरोधकांनी जातीचे राजकारण सुरु केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे प्रभाग तीन मधील निवडणूक तिरंगी बनून प्रतिष्ठेची बनली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. अशीच बंडखोरी प्रभाग ३ मध्ये झालेली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यापुढे झुकत सेना नेतृत्वाने भूषण भोईर आणि मधुकर पावशे या नगरसेवकांची तिकीट कापली आणि निलंबित शाखाप्रमुखाला उमेदवारी दिली. त्यामुळे सेनेच्या दोन्ही माजी नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि वाद वाढू लागले.
अशा वेळी शिंदे यांची एका कार्यकर्त्यांना धमकावणारी ऑडिट क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. मीनाक्षी शिंदे ह्या त्या कार्यकर्त्यांना धमक्या आणि शिवीगाळ तसेच आगरी समाजाबाबत अपमानास्पद शब्द वापरले. याबाबत विरोधी पक्षातील उमेदवार , नेत्यांनी शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मानपाड्यात धाव घेऊन संबंधित कार्यकर्त्यांना धीर देत पोलीस कारवाईची मागणी केली. तसेच शिंदे यांनी पुन्हा असा प्रकार करू नये, अन्यथा आगरी समाजाची ताकद काय आहे हे दाखवले जाईल, असा इशारा दिला. असाच इशारा उबाठा गटाच्या माहेश्वरी तरे यांनीही दिला आहे. हे माझे बनावट संभाषण असून एआयच्या माध्यमातून ही ऑडीटो क्लिप तयार केल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी करीत विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकल्याने असा प्रकार घडविण्यात आल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रभागातील निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.