ठाणे : विविध प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्या कुटुंबांचे ठाणे महापालिकेने वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल मध्ये पुर्नवसन केले. या दोस्ती रेंटल मधील कुटुंबांना प्रथमच ठाणे महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिशींमध्ये थकीत भाडे व इतर देयके तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी भाडे भरण्याबाबत हरकत नसल्याचे स्पष्ट केले असले, तरीही भाडे भरल्यानंतरदेखील 25 मार्चपर्यंत घरे महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक, झोपडपट्टीधारक, रस्ते रुंदीकरण (रोड कटिंग) आणि नाल्यालगत राहणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या रेंटल हाऊसिंग प्रकल्पांमध्ये स्थलांतरित केले. या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यात आला होता.
उन्हाळ्याच्या तोंडावर कुटुंबांनी लहान मुले, महिला यांना घेऊन अचानक कुठे जायचे, असा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने पहिली ते नववीच्या परीक्षा 22 एप्रिलपर्यंत निश्चित केल्या असून, या रेंटल इमारतींमध्ये राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत अचानक स्थलांतराच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.
1400 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार
दोस्ती रेंटलच्या चार इमारतींमधील सुमारे 1400 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. काही रहिवाशांचे एक किंवा दोन महिन्यांची घरभाड्याची थकबाकी आहे, ज्यांच्या थकबाकीची रक्कम मोठी आहे, त्यांनीही थकबाकी भरण्यास प्रारंभ केला आहे. या चार इमारतींपैकी इमारत क्रमांक चार मध्ये बहुतांश पोलीस मंडळी देखील आहेत. नोटीशीत तात्काळ थकबाकी भरण्याचे आदेश देताना, पुनर्वसन करण्यात येणाऱ्या रहिवाशांसाठी 11 महिन्यांच्या तात्पुरत्या निवासाचा उल्लेख प्रथमच करण्यात आला. तसेच न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून घरे ताब्यात घेतली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
आधी पुनर्वसन करा; रहिवाशांची मागणी
प्रत्येक इमारतीत 4 पैकी एकच लिफ्ट का सुरू चारही लिफ्ट 24 तास का सुरू नाहीत. 2013 पासून पुनर्वसनासाठी स्थलांतरित 1400 कुटुंबांकडून घर खाली करण्याची नोटीस ठाणे महापालिकेने 16 मार्चला हजारो रहिवाशांना दिली. थकीत भाडे न भरल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. मात्र महापालिकेने आमचे पुनर्वसन करायला हवे तोपर्यंत आम्ही जाणार कुठे असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे. 16 मार्च 2026 रोजी ठाणे महापालिकेने बजावलेल्या नोटीशीत काहींचे 10 हजार ते 50 हजारांहून अधिक भाडे थकीत असल्याचे नमूद आहे. पाणी देयकेही काही ठिकाणी थकीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे रहिवाशी शितल चांदवडकर यांनी सांगितले.
रहिवाशांनी, थकीत भाडे भरण्यास सुरुवात केली असून काहींनी नियमित भाडे भरले आहे. तरीही घर खाली करण्याचा आदेश दिल्याने भाडे भरल्यानंतरही आम्ही कुठे जावे?तुषार भोंडवे, सरला पवार
लिफ्ट सेवा बंद; दहा मजले जिने चढावे लागतात. आठवड्यातून एक-दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असतो, पाणीपुरवठा वेळ कमी; सकाळ-संध्याकाळ अपुरा पुरवठा होतो. स्वच्छते अभावी परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.आरती भाबड
दोस्ती रेंटलमध्ये सुविधांचा अभाव
लिफ्ट सेवा अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रहिवाशांना 10 मजले जिने चढावे लागतात. कचरा व्यवस्थापन अपुरे असून परिसरात घाण साचते. पाणीपुरवठाही अनियमित असून आठवड्यातून एक-दोन दिवस पाणी येत नाही, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे. ठाणे महापालिकेकडून दिवसाला दोन वेळेस पिण्याचे पाणी सोडणे बंद केले जाते ते का थांबवले पिण्याचे पाणी शुद्ध आहे की अशुद्ध याचे सार्वजनिक प्रयोगशाळेचा अहवाल महापालिकेने घोषित करावा. नियम पालन करणाऱ्या रहिवाशांना त्रास व्हायला, असे वैभव वाघ संतोष निकम यांनी सांगितले.