Thane Firecracker Testing pudhari photo
ठाणे

Thane Firecracker Testing : ऑल आऊट ५००० फटाक्यांचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद!

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात १९ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून फटाक्यांची तपासणी सुरू केली आहे. ठाण्यात गुरुवारी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या १९ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ‘ऑल आउट ५०००’ या फटाक्याने सर्वाधिक १११.८ डेसिबल आवाजाची नोंद केली. तर ‘कुरवी चिमणी’ या फटाक्याचा आवाज सर्वात कमी म्हणजे ७४.४ डेसिबल आढळला.

उच्च न्यायालयाने ध्वनी आणि वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या फटाक्यांबाबत निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

वागळे इस्टेट येथील एका कंपनीच्या मोकळ्या जागेत हा चाचणी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे १९ फटाके फोडून त्यांचा आवाज डेसिबलमध्ये मोजण्यात आला. या चाचणीत ‘ऑल आउट ५०००’ने सर्वाधिक आवाजाची नोंद केली. त्यापाठोपाठ टू गोल्ड फटाक्याचा आवाज १०७.३ डेसिबल, आर.के.चा ९९.९ डेसि., मॅक्सचा ९४.३ डेसिबल आणि सुदामचा ९१.४ डेसिबल नोंदवण्यात आला. दुसरीकडे रेल्वे सिग्नल लाईट या फटाक्याचा आवाज सर्वात कमी ६७.६ डेसिबल आढळला. गेल्या वर्षीही याप्रकारे २५ फटाक्यांची चाचणी घेण्यात आली होती.

या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, संजीव रेदासानी, ठाणे महापालिकेचे उपपर्यावरण अधिकारी ओम परळकर, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे हवालदार पवन नाजन व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवले जात आहे. बाजारातून विविध फटाक्यांचे नमुने खरेदी करून त्यांची मोकळ्या जागेत चाचणी घेतली.

डेसिबल निर्देशांकानुसार नोंदीची माहिती उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी दिली. नागरिकांनी न्यायालयाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे. ध्वनी, वायु प्रदूषण टाळण्यासाठी हरित फटाके तसेच कमी आवाजाचे फटाके वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदासानी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT