Thane Agriculture News : बियाणे बोगस निघाले; शेतकऱ्याने पेटवले अधिकाऱ्यांसमोर ६ एकराचे वावर

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा सुरू असतानाच कंपनीच्या प्रतिनिधीने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले
Farmer Sets Paddy Crop on Fire
Farmer Sets Paddy Crop on Firepudhari photo
Published on: 
Updated on: 

किन्हवली : संतोष दवणे

रुसलेल्या पावसाने शहापूर तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केलेले असताना बियाणे विक्रेता कंपनीचे भाताचे बियाणेच बोगस निघाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने कृषी अधिकारी व बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीसमोरच आपल्या ६ एकरातील भातपिकाला आग लावून दिल्याची घटना बुधवारी किन्हवली जवळील वाचकोले गावात घडली आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा सुरू असतानाच कंपनीच्या प्रतिनिधीने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले असून या घटनेमुळे किन्हवली परिसरात खळबळ उडाली आहे.

Farmer Sets Paddy Crop on Fire
Diwali Mud Fort : स्मार्टफोनच्या काळातही किल्ल्याची परंपरा कायम

शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील वाचकोले येथील शेतकरी मनोहर मलिक यांनी जून महिन्यात पेरणीसाठी सरळगाव येथून एक काडी प्रकारातील ३० किलो संकरीत भातबियाणे १४ हजार ७०० रुपये किमतीला खरेदी केले होते. यावेळी कंपनीकडून बियाण्‍यांबाबत भरघोस उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मलिक यांच्या शेतात ८० टक्के भातपीक निकृष्ट, काळे व सुकलेले निघाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

सहा एकरामध्‍ये हे बोगस भात बियाणे निघाल्याने या शेतकऱ्याचा सुमारे दोन लाख रुपये खर्च पाण्यात गेला आहे. मनोहर मलिक यांनी याप्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी संबंधित शेतात पंचनामा करण्यासाठी कृषी सहाय्यक अंकिता मोरे, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी अशोक इसामे आदी पोहोचले.

यावेळी उपस्थित अधिकारी हे पंचनामा करत असतानाच कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना 'हा बियाणा आकाशातून पडला असेल' असे बेजबाबदारपणे वक्तव्य केले. या वक्तव्‍यामुळे शेतकरी संतप्त झाला. दरम्यान संतप्त शेतकरी मलिक यांनी यावेळी नैराश्यातून उपस्थित अधिकाऱ्यांसमोरच आपल्या सहा एकर भातशेतीला आग लावली. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली.

Farmer Sets Paddy Crop on Fire
Mumbai Air Pollution : मुंबईत प्रदूषणाचा धुरळा; पालिकेची ६८ पथके निष्प्रभ!

प्रचंड नुकसान झालेला हा हतबल शेतकरी हातात बियाणाच्या पुड्या व खरेदीचे बील घेऊन प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत आहे. शेतकऱ्याने हतबल होऊन सहा एकर वावर पेटवण्‍याचा प्रकार पाहता शहापूरचा कृषी विभाग व कंपनी प्रशासन या प्रकरणी आता काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शेतकरीवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

"तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात देवभात प्रकारचे भात उगवले आहे. किन्हवली परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कृषी शास्त्रज्ञांनी भेट देऊन अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. वाचकोले येथील शेतकऱ्याच्या बाबतीत जर कंपनीने फसवणूक केली असेल तर कंपनीवर कारवाई करण्यात येईल."

कुमार जाधव, कृषी अधिकारी, शहापूर

" सहा एकर भातशेती उद्ध्वस्त झाल्याने माझे कुटुंब रस्त्यावर आले आहे. प्रशासनाने मला कंपनीकडून भरपाई मिळवून द्यावी अशी कळकळीची विनंती आहे.

मनोहर मलिक, शेतकरी, वाचकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.