Thane district bank news Pudhari
ठाणे

Thane district bank news: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विक्रमगडमधून तिरंगी लढत

शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे, भाजपचे संदीप पावडे आणि सुनील पाटील आमनेसामने

पुढारी वृत्तसेवा

विक्रमगड: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विक्रमगड मतदारसंघातून तिरंगी लढत निश्चित झाली असून शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते तथा जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, भाजपचे नेते व माजी पालघर जिल्हा परिषद सभापती संदीप पावडे आणि मागील निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभूत झालेले सुनील पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. यंदा विक्रमगड मतदारसंघात तीन प्रभावशाली चेहरे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही लढत जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे.

विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत सुनील पाटील यांना निलेश सांबरे यांनी उघड पाठिंबा दिला होता. सांबरे यांच्या समर्थकांनीही पाटील यांच्या विजयासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही सुनील पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. त्यामुळे त्या निवडणुकीची चर्चा आजही सहकार क्षेत्रात रंगताना दिसते.

यंदा मात्र राजकीय परिस्थिती बदलली असून मागील निवडणुकीत एकाच बाजूला असलेले निलेश सांबरे आणि सुनील पाटील हे थेट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.

शिवसेनेचे उपनेते म्हणून निलेश सांबरे यांची पालघर, ठाणे आणि परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले जनसंपर्काचे जाळे आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांची प्रमुख ताकद मानली जाते.

दुसरीकडे भाजपचे नेते संदीप पावडे यांचे पक्षातील वरिष्ठ पातळीवरील संबंध आणि दीर्घकालीन राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीमागे भाजपची संपूर्ण ताकद उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील दोन प्रभावशाली नेते अप्रत्यक्षपणे आमनेसामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर मागील निवडणुकीतील एका मताच्या पराभवानंतर जिल्हा बँकेचे माजी संचालक राहिलेले सुनील पाटील यांच्याकडून यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील मतदार कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT