

मिरा रोड: भाईंदरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका 77 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 1 कोटी 27 लाख 86 हजार 182 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्व येथील शिव महल, आर.एम.पी. पार्क परिसरात राहणारे राधेश्याम रामगोपाल खेतान (वय 77) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. सायबर गुन्हेगारांनी विविध मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्याशी संपर्क साधून व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला.
यावेळी आरोपींनी पोलीस गणवेश परिधान करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासविले. खेतान यांचे बँक खाते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरण्यात आले असून त्यांच्यावर 20 गुन्हे दाखल असल्याचे खोटे सांगून आरोपींनी त्यांना घाबरवून सोडले. तसेच या प्रकरणात त्यांचे नाव संशयित म्हणून समोर आल्याचा दावा करत कायदेशीर कारवाई आणि अटकेची भीती दाखविण्यात आली.
सायबर भामट्यांनी तपास आणि चौकशीच्या नावाखाली खेतान यांच्याकडून त्यांच्या बँक खात्यांची, ठेवींची व मालमत्तेची माहिती मिळवली. त्यानंतर प्रकरणातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे पाठविण्यास भाग पाडले. अशा प्रकारे वेळोवेळी एकूण 1 कोटी 27 लाख 86 हजार 182 रुपये आरोपींनी त्यांच्या खात्यातून वळते करून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खेतान यांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन मोबाईल क्रमांकधारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवघर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ढुमे करीत आहेत.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
पोलीस, सीबीआय, ईडी किंवा न्यायालय कधीही व्हिडिओ कॉलवर पैसे भरण्याचे आदेश देत नाहीत.
डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्यातअस्तित्वात नाही.
अज्ञात व्यक्तींना बँक खाते, ओटीपी किंवा आर्थिक माहिती देऊ नका.
संशयास्पद कॉल आल्यास तत्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार पोलीस, सीबीआय, ईडी किंवा इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना धमकावतात. गुन्ह्यात नाव आल्याची भीती दाखवत आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकाराला ‘डिजिटल अरेस्ट’ असे संबोधले जाते. पोलिसांनी नागरिकांना अशा कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.