ठाणे : दोनशे प्रजातींच्या पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या आणि फ्लेमिंगोंसाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे खाडीच्या 17 चौरस किमी क्षेत्रावर संरक्षित क्षेत्रात गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.
ठाणे खाडीत फ्लेमिंगो अभयारण्याजवळ रामनगर नवी मुंबई भागात गृहनिर्माण प्रकल्पांना पर्यावरणीय नियम लावण्यात आले आहेत. एक क्षेत्र रामसर पाणथळ हेक्षेत्र असल्याने संवेदनशील भाग येतो. त्यामुळे बांधकामांवर निर्बंध आहेत. तरीही काही विकासकांकडून बांधकामे सुरूच ठेवण्यात आली आहेत.
ठाणे खाडीचे 1690 हेक्टर क्षेत्र हे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील हे प्रमुख रामसर क्षेत्र आहे. म्हणूनच नेरूळ येथील काही बांधकामांना वनविभागाने आणि येथील प्राधिकरणने नोटीसा बजावल्या आहेत. या प्रकल्पांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. या क्षेत्रात फ्लेमिंगोंबरोबरच 200 प्रजातींच्या पक्ष्यांचे हे आश्रयस्थान आहे. यात स्थलांतरीत पक्ष्यांचाही समावेश आहे. या प्रजातीमध्ये रोहित म्हणजेच फ्लेमिंगो हा केंद्रबिंदू आहे. उंच गुलाबी असा हा पक्षी पर्यटकांचे आकर्षण आहे.
हा पक्षी लांबलचक मोहक पाय, मोठी मान आणि मोठे पंख यामुळे आकर्षक दिसतो. नोव्हेंबर महिन्यात हजारोंच्या संख्येने ठाणे खाडीत दाखल होतात. या खाडीलगत मोठी कांदळवनेही आहेत. ही पक्ष्यांची अंडी घालण्याची ठिकाणे आहेत. भारत सरकार फेड्रल रिपब्लीकन ऑफ जर्मनी यांच्यामधील इंटरनॅशनल क्लायमेट इनिशिएटीव्ह कराराच्या माध्यमातून सागरी जैवविविधता आणि किनारी सागरी संरक्षित क्षेत्र याचे शाश्वत व्यवस्थापन सुरू आहे. यामुळे ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याची अधीसूचनाही जाहीरझाली. हे मोठे सागरी अभयारण्य असल्याने याचे महत्व अधिक आहे. मात्र, सध्या होत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या अतिक्रमणामुळे येथे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
खाडीकिनारा हे मोठे पाणथळ क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात जलचर आणि वनस्पतींचे केंद्र आहे. पुराची तीव्रता कमी करण्यासाठी आणि धूप रोखण्यासाठी या कांदळवनांचा मोठा उपयोग होतो. मुंबईचे वाढते शहरीकरण लक्षात घेऊ न या भागाची जैवविविधता टिकावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. म्हणून हा खाडीकिनारा वाचविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ठाण्यातील खाडीकिनारा हे पहिले रामसरथळ बनले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्थळ घोषित झाले असून रामसर म्हणजेच कोणताही भूभाग ज्याला सतत पाण्याचा पुरवठा होतो किंवा तो पाण्याखाली जातो असा भाग आहे.
भारताने 1982 मध्ये रामसर करारावर सही केली आहे. याभागात खारफुटीच्या 12 खाऱ्या झाडांच्या प्रजाती आहेत. 39 सहयोगी प्रजाती आहेत. त्यामुळे रामसरसाठी हे आदर्श स्थान मानले गेले आहे. या भागात 197 प्रजातीचे पक्षी येतात. येथे माशांच्या 45 प्रजाती, फुलपाखरांच्या 39 प्रजाती, किटकांच्या 67 प्रजाती असा भरगच्च खजिना आहे. फ्लेमिंगो हिवाळ्यात प्रजननासाठी येथे येतात. 1 लाखाहून अधिक फ्लेमिंगो पक्ष्यांमध्ये ग्रेटर आणि लेसर अशा दोन जातींचे फ्लेमिंगो आढळतात. याशिवाय गोल्डन फ्लोवर, ग्रेट स्पॉटेड सीगल, पाईड ॲव्होसेट आणि रडीटर्न्टोन अशा पक्ष्यांच्या जाती येथे मोठ्या संख्येने आहेत.
1980 च्या दशकात ठाणे खाडीमध्ये एक समृद्ध संस्था होती. परंतु बेसुमार शहरीकरण आणि जमिनीची भरण, दलदलीचे भाग बुजविणे, खारफुटींची झालेली तोड, समुद्राच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखणे, खाडीच्या किनारी कचऱ्याचे ढिगारे टाकणे अशा मानवी दबावांमुळे या भागाचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.
राज्य सरकारने 1 हजार 690 हेक्टरभाग फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. यापैकी 896 हेक्टर भागात खारफुटीची जंगले आहेत. तर 794 हेक्टरमध्ये पाणी आहे. या भागातील या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे या भागाचे महत्त्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.