ठाणे ः रस्त्यावर झोपणार्या मुलांना पळवून नेणार्या टोळीस ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी 3 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यातील तक्रारदार वनिता पवार या भंगार वेचण्याचे काम करतात. त्यांना घर नसल्याने त्या जागा मिळेल तेथे रात्रीचा निवारा घेतात. 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्या पती व मुलांसह राबोडीकडे रोडवर पुलाखाली झोपल्या होत्या. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांचा 5 महिनांचा मुलगा जागेवर नव्हता. त्यांनी मुलाचा शोध घेतला. पण मुलगा न मिळाल्याने त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत मरकड यांनी केला. सी. सी. टीव्हीचे फुटेज आणि तांत्रिक चाचण्याच्या आधारे अमजल अली न्हावी, जयश्री नाईक, सुरेखा खंडागळे यांना पोलिसांनी अटक करून दोषारोप पत्र सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या समोर झाली. या प्रकरणाचे गांभीय लक्षात घेवून सत्र न्यायाधीश यांनी हा खटला सुनावणीसाठी घेतला.
आरोपींनी मुलाला पळवल्याचा सी.सी.टी.व्ही फुटेजचा पुरावा असल्याने आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, असा युक्तीवाद सरकारी वकील अॅड. संजय मोरे यांनी केला होता. पुराव्याच्या आधारे न्यायालयाने या तिघांना 3 वर्षे सश्रम कारावासाची आणि 500 रूपये दंडाची सजा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची आरोपींना भोगावी लागणार आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता लागू झाल्यापासून एका वर्षात शिक्षा होण्याची ठाणे न्यायालयात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या प्रकरणाती सरकारी वकील संजय मोरे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले. या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार निकुंभे यांनी काम पाहिले.