ठाणे: ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट महिनाभर आरोग्य कर्मचारी गावोगावी जाऊन घरभेटीद्वारे कुष्ठरोग, हत्तीरोग आणि नेत्रविकारांच्या संशयित रुग्णांचा सक्रिय शोध घेणार आहेत. वेळेत निदान होऊन उपचार सुरू व्हावेत, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी थेट नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्यविषयक माहिती घेतील.
कुष्ठरोगाची लक्षणे, हत्तीरोगाची चिन्हे किंवा नेत्रविकारांची तक्रार असलेल्या व्यक्तींना पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्रात पाठविले जाणार आहे. संशयित रुग्णांची नोंद करून त्यांचे वेळेत निदान आणि उपचार सुनिश्चित करण्यावर भर राहणार आहे.
कुष्ठरोगासाठी त्वचेवर संवेदनाशून्य किंवा न दुखणारे चट्टे, हात-पाय सुन्न होणे अशी लक्षणे तपासली जाणार आहेत. हत्तीरोगासाठी हात किंवा पायाला असामान्य सूज, वारंवार ताप येणे यासारख्या लक्षणांची पडताळणी केली जाणार आहे.
तर २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रतपासणी शिबिरांद्वारे मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टीदोष आणि मधुमेहामुळे होणाऱ्या नेत्रविकारांची तपासणी केली जाणार आहे. घरभेटीदरम्यान नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती द्यावी, तपासणीची गरज असल्यास विलंब न करता आरोग्य केंद्रात जावे आणि उपचार पूर्ण करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
'माझं गाव–आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा सहभाग राहणार असून प्रत्येक गावात कृती आराखड्यानुसार मोहीम राबविण्यात येणार आहे.
घर भेटीदरम्यान काय होणार?
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार.
कुष्ठरोग, हत्तीरोग आणि नेत्रविकारांची लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार.
संशयित रुग्णांची नोंद करून पुढील तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात पाठविले जाणार.
आवश्यकतेनुसार उपचार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार.
नागरिकांना लसीकरण, स्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत माहिती दिली जाणार.
घरभेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.