ठाणे

ठाणे : बूस्टर डोसकडे नागरिकांची पाठ! केवळ १३ टक्के लसीकरण; जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

backup backup

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : चीनसह आशिया खंडातील काही देशांमध्‍ये कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे पुन्हा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण केलेल्या म्हणजेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांपैकी केवळ १३.२९ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेतल्याचे लसीकरण अहवालातून समोर आले आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती नाहीशी झाली होती. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. आता पुन्हा लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात १२ ते १७ वयोगटातील ८ लाख १८ हजार २६५ एवढ्या मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला देण्यात आले होते. त्यापैकी पहिला डोस ४ लाख ९९ हजार ५८ जणांनी घेतला आहे. तर, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३ लाख ६६ हजार ९०४ एवढी आहे. उद्दिष्टाच्या ४४ टक्के मुलांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला १८ वर्षावरील वयोगटातील ४७ लाख ९७ हजार ५९६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६५ लाख ९८ हजार ७४० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ५९ लाख ८१ हजार ७१७ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या तुलनेने अत्यल्प असून, केवळ ८ लाख ४३ हजार ५४० नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे केवळ १३ टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले असून, कोरोनापासून बचावासाठी महत्वपूर्ण असलेल्या लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

कोरोनाची लागण झाली तर त्याची तीव्रता कमी रहावी, यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक आहे. कोरोनाच्या लाटेत जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवित लसीकरणावर भर दिला. मागील सहा ते आठ महिन्यांपूर्वी लसीकरण केंद्रांवर दररोज २ ते ३ हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होत असे. मात्र, रुग्ण संख्या घटताच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली असून, आता जिल्ह्यात दररोज जवळपास ५०० नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. सध्या चीनसह काही देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. त्यानुसार लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT