नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट (Corona Update) नोंदवण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात १५७ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, केरळमध्ये एका कोरोना रुग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला. दरम्यान दिवसभरात १९८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली.
मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्के तर कोरोना मृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तर, देशाचा दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.३२ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.१८ टक्के नोंदवण्यात (Corona Update) आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ७७ हजार ४५९ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४३ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ३ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ६९६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.०४ कोटी डोस लावण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान सोमवारी दिवसभरात ४९ हजार ४६४ कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हिमाचल, तेलंगणा तसेच ओडिशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा कोरोनाचे संकट उद्भवले तर त्याला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांनी आपल्या सुसज्जतेला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील प्रमुख रुग्णालयांमध्ये मंगळवारी कोविड प्रतिसादात्मक माॅक ड्रील करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात जाउन या माॅक ड्रीलची पाहणी केली.
हेही वाचलंत का ?