ठाणे; भाग्यश्री आचार्य : रिक्षाचालकांची दादागिरी वाढली असल्याच्या बातम्या वारंवार येत असतानाच आंबिवली रेल्वे स्थनाकात रिक्षाचालकाने रिक्षा थेट फलाटावर आणल्याने गोंधळ उडाला. मात्र ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना नसून ठाणे रेल्वे स्थानकात देखील रिक्षाचालक थेट फलाटावर येऊन प्रवाशांची लूट करत असल्याचे चित्र अनेकवेळा दिसून येते, मात्र या सर्व घटनांवरून रेल्वेच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास येत आहे.
आंबिवली रेल्वे स्थानकात रिक्षा चालक आपली रिक्षा फलाटवर नेऊन प्रवासी वाहतूक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सांगितले की, सोमवारी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास रिक्षाचालक चक्क फलाटावर रिक्षा आणून प्रवाशांची वाहतूक करत होता. याआधी देखील ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 आणि फलाट क्रमांक 2 येथे येऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर या रिक्षाचालकांनी अनोखी शक्कल लढवून थेट फलाटापर्यंत चालत जाणे पसंत केले आहे. थेट फलाटावर जाऊन प्रवाशांना कुठे जायचे आहे हे विचारुन त्याना भंडावून सोडणे, त्यांच्याकडून अधिक पैसे उकळणे यासारख्या अनेक घटना याआधी देखील घडल्या आहेत . सामान्य माणसाला नुसत्या फलाटावर जाण्यासाठी रेल्वेला फलाट तिकिटासाठी 50 रुपये मोजावे लागतात असे असताना रिक्षाचालक थेट फलाटावर येतात कसे त्यांना परवानगी कशी मिळते , त्याना टिसी विचारत नाहीत का असे एक ना अनेक प्रश्न सर्व सामन्यांना पडत आहेत. इतकंच नव्हे तर रिक्षाचालक अनेकवेळा प्रवाशांवर दादागिरी करताना देखील दिसून येतात. कधी मीटर मध्ये गल्लत तर कधी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन करणे असे अनेक प्रकार सध्या ठाणे जिल्ह्यात दिसून येत आहेत.
हेही वाचा