बारामती: ‘तुमचे पैसे मागे पडले आहेत’, अशी बतावणी चोरट्यांनी पळवले दोन लाख | पुढारी

बारामती: 'तुमचे पैसे मागे पडले आहेत', अशी बतावणी चोरट्यांनी पळवले दोन लाख

बारामती, पुढारी वृत्तसेवा: तुमचे पैसे मागे पडले आहेत, अशी बतावणी करत दुचाकी थांबवायला भाग पाडत गाडीच्या हॅण्डलला अडकवलेली पिशवी दोघा चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शहरातील कसब्यातील कर्हा नदीच्या पुलावर घडली. या पिशवीमध्ये बॅंकेतून काढलेले दोन लाख रुपये होते, ते घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात जयकुमार निवृत्ती गवळी (वय ४१, रा. बर्हाणपूर, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि. ५) ही घटना घडली.

फिर्यादी हे सोमवारी पत्नीसह शहरातील नेवसे रस्त्यावरील आयसीआयसीआय बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले. परंतु, वेळ लागेल असे उत्तर बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी दिल्याने ते माळेगावला गेले. तेथे पुणे जिल्हा बॅंकेच्या शाखेतून त्यांनी ५० हजार रुपये काढत ते पिशवीत ठेवले. दोघे पती-पत्नी पुन्हा बारामतीला आले. त्यांनी आयसीआयसीआय बॅंकेतून दीड लाख रुपये काढले व ही रक्कम पिशवीत ठेवली. दुचाकीवरून ते बसस्थानकावर गेले. तेथे फिर्यादीने पत्नीला एसटीने घरी पाठवून दिले.

बॅंकेतून काढलेली रक्कम शहरातील खंडोबानगर येथील मावस भावाकडे ठेवण्यासाठी फिर्यादी निघाले होते. खंडोबानगरच्या जवळ रिंगरोडकडे जाणाऱ्या चौकात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तुमचे पैसे मागे पडले आहेत, अशी बतावणी केली. दुचाकी उभी करून फिर्यादी पाठीमागे १५ ते २० फुटांवर गेले. तेथे १०० रुपयांच्या पाच नोटा पडल्या होत्या. त्या घेत असताना या दोन चोरट्यांनी दुचाकीला अडकवलेली पिशवी घेऊन पाटस रस्त्याच्या दिशेने पलायन केले.

Back to top button