ठाणे: टीडीआर घोटाळ्यामुळे वनखात्यासह ठाणे महानगर पालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगर पालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अॅमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे.
या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील, असा दावा केला जात असला तरी केवळ ६० जणांना नोकऱ्या मिळणार असून त्याबदल्यात ६०० ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच ३० एम. एल. डी. पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे १२ एम. एल. डी. पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे.
तसेच, अमर्याद वीज वापर, ध्वनिप्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.
तर, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी, हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मूळावर उठला असून पर्यावरणीय हानीदेखील मोठ्याप्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटरविरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूनेही लढा देणार आहोत, असे सांगितले. अॅमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकूम परिसरात १ हजार ८३० कोटी रूपयात १३० कोटींचे मुद्रांक शुल्क भरून ५३ एकर जमीन खरेदी केली आहे.
येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मूळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या पत्रकार परिषदेस गटनेते अभिजीत पवार आणि महिलाध्यक्ष मनिषा भगत हेदेखील उपस्थित होते. याबाबत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, डेटा सेंटर शहरापासून दूर असावा, असे नियम आहेत.
मात्र, गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांच्या जवळ असलेल्या या ५४ एकर जागेवर हे डेटा सेंटर उभारण्यात येत आहे. निवासी असो की औद्योगिक, २०,००० पेक्षा जास्त चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या कोणत्याही प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालाबाबत ठाणेकरांना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे.
आधीच या ठाण्याला धरण नाही. मुंबई पालिका, स्टेम आणि एम.आय.डी.सीच्या ऑजळीतून आपणाला पाणी प्यावे लागत आहे. आता हे पाणीही अॅमेझॉनच्या घशात ओतण्याचा कट रचला आहे. ठाणे शहराला आधीच दररोज ३० एम.एल.डी. पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
मग डेटा सेंटरमधील कुर्लिंग प्रक्रियेसाठी लागणारे पिण्याचे पाणी ते कुठून आणणार? असा सवाल करून त्यासाठी ठाणे महानगरपालिका दररोज १२ एम. एल. डी. पाणी पुरवणार आहे असे त्यांनी सांगितले. याबाबत आमचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या प्रकल्पाच्या पाण्याच्या गरजांसह विविध बाबींची माहिती मागवून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. तरीही महासभेच्या विषय पत्रिकेसोबत गोषवारा दिलेला नाही.
गोषवारा मागितल्यावर अति. आयुक्त माळवींकडे बोट दाखविले जाते. त्यांचा काय संबंध आहे, हे जाहीर करावे. विषयपत्रिकेवर सचिवांची स्वाक्षरी असते. परिणामी, हा गोषवारा न देऊन सचिव मनिष जोशी यांनी नगरसेवक आणि ठाणेकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.
हा प्रकल्प जिथे नागरी वस्ती नाही तिथे व्हायला हवा. कारण, ध्वनिप्रदूषणाची तीव्रता एवढी असणार आहे की लोकांना कानाचे विकार होतील, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतील. हे माहित असूनही जर डेटा सेंटर उभारले जाणार असतील तर आयुक्त, उपायुक्त, सहा. आयुक्त यांच्यासह महापौर, उपमहापौर यांची निवासस्थाने डेटा सेंटरच्या परिसरात उभारा. कारण, हा सर्व प्रकार अर्थकारणातून होत आहे. ते रोखायला हवे. त्यासाठी महासभेत, येत्या अधिवेशनातही विरोध करणार आहे.
या प्रकरणात "देवाण-घेवाण झाली असल्याची शक्यता
मनोज प्रधान म्हणाले, ठाणेकरांचे पाणी, वीज जबरदस्तीने घेऊन अॅमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत ठाण्यात ५० निवारे बांधणार आहे. हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत. त्या बदल्यात ठाण्याचे पाणी, वीज जबरदस्तीने घेतली जाणार आहे. म्हणजेच या प्रकरणात "देवाण - घेवाण" झाली असल्याची दाट शक्यता आहे.
म्हणून महासभेच्या विषय पत्रिकेवर हा विषय आणला असताना गोषवारा मात्र देण्यात आलेला नाही. प्रस्तावित प्रकल्पाच्या ०१ किमीच्या परिघात आठपेक्षा जास्त मोठे गृहनिर्माण संकुल, पाच शाळा आणि तीन रुग्णालये आहेत, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून ४०० मीटरच्या आत असलेल्या एका बाल रुग्णालयाचाही समावेश आहे.
जगभरातील मोठे डेटा सेंटर्स २० डेसिबल्सपर्यंतचा सततचा आवाज निर्माण करू शकतात. इतर उद्योगांच्या उलट, डेटा सेंटर्समधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही. याचा परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्याची गरज आहे.
या डेटा सेंटरचा पर्यावरणावरही याचा परिणाम होऊ शकतो, असे नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा चाळीशी गाठत आहे. आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान ३°C ते ५°C पर्यंत वाढू शकते. हे धोकादायक आहे, कारण स्थानिक रहिवाशांशी याबाबत कोणतीही सल्लामसलत केलेली नाही आणि या डेटा सेंटरमुळे आरोग्याला गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे प्रधान म्हणाले.