पालिका अधिकाऱ्यांच्या कृपेने ठाण्यात दररोज 60 एमएलडी पाणीचोरी pudhari photo
ठाणे

Thane News : पालिका अधिकाऱ्यांच्या कृपेने ठाण्यात दररोज 60 एमएलडी पाणीचोरी

अधिकाऱ्यांवर गुन्हे दखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : भातसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणीचोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करीत नाहीत, असा आरोप करून येत्या आठवडाभरात संबधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणीचोरी थांबवावी अन्यथा, सदर ठिकाणी जाऊन पाणीचोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उखडून लावू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणीचोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान उपस्थित होते.

प्रधान म्हणाले की, ठाणे महानगर पालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघुधरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते. शुद्ध केलेले हे पाणी माणकोली येथील एमबीआरमध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरीत करण्यात येत असते. पिसे धरणातून ठाणे महानगर पालिका सुमारे 280 ते 310 दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. मात्र, प्रत्यक्षात ठाणेकरांना 250 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होत आहे. या मागे दररोज होणारी 60 दशलक्ष लीटर पाणीचोरी हे मुख्य कारण आहे.

पिसे ते टेमघर दरम्यान सोनाळे, चौधरपाडा, बापगाव, मुठवळ, सावद, आमनेपाडा, किरवली, पिसे आणि देवरूंग ही गावे आहेत. या गावांच्या परिसरात असलेल्या एअर व्हॉल्वला बेकायदेशीरपणे टॅपिंग करण्यात आलेले आहेत. त्यामाध्यमातूनच ही पाणीचोरी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

देवरूंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी बेकायदेशीरपणे चार इंचाची जोडणी करण्यात आलेली आहे. मुठवल गावातील डिलीव्हरी कंपनी, जय महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन कंपनी यांना बेकायदेशीरपणे 6 इंचाची जोडणी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच दररोज सुमारे 60 दशलक्ष लिटर्सची पाणीचोरी होत आहे. गेली 9 वर्षे हा प्रकार सुरू आहे. दरमहा 1800 दशलक्ष लिटर्स याप्रमाणे वर्षाला 21 हजार 600 आणि गेल्या 9 वर्षात 1 लाख 94 हजार चारशे दशलक्ष लीटर पाण्याची चोरी केली जात आहे.

कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता (प्रकल्प) यांच्या संगनमताने हा पाणीचोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठ्याप्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आपणाला संशय आहे. त्यासाठीच पिसे ते टेमघर दरम्यान पाणीगणक यंत्रणाही बसविण्यात आलेली नाही, असेही मनोज प्रधान म्हणाले.

पाणीचोरी रोखली नाही तर टॅप उखडून लावू...

ही पाणीचोरी थांबवावी, यासाठी आपण 16 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही दिले आहे. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दररोज होणाऱ्या 60 दशलक्ष लिटर्स पाण्याची चोरी रोखली तर एका विभागाची पाणी टंचाई कमी होऊ शकते. त्यामुळे संबधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येत्या आठवडाभरात जर ही बेकायदेशीर पाणी चोरी रोखली नाही तर सदर ठिकाणी जाऊन सर्व टॅप उखडून लावू, असा इशाराही प्रधान यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT