

वाडा : परतीच्या अवकाळी पावसाने वाडा तालुक्यातील भातशेतीची दयनीय अवस्था केली असून पावसात शेती आडवी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेती सोबत आता फुलशेती संकटात असून भाजीपाला उत्पन्नावर देखील परिमाण होणार आहे. रब्बी पिकांची उशीरा पेरणी झाल्याने कडधान्य व तेलबिया उत्पन्नावर परिमाण होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्यात भातशेती सोबतच फुलशेती भरारी घेत असून मोगरा, सोनचाफा व झेंडू फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गातेस खुर्द गावात तालुक्यातील सर्वाधिक झेंडू लागवड केली जात असून गातेस हे झेंडूचे आगार मानले जाते.
नामदेव पाटील यांना विचारणा केली असता 6 हजार रोपांची लागवड दरवर्षी ते करीत असून त्यासाठी 30 हजारांचा खर्च येऊन लाख ते दिडलाख उत्पन्न मिळते. दिवाळी नंतर खरेतर फुल शेतीची लागवड करणे गरजेचे असून थंडीत फुलांना चांगला बहर येतो.
पावसाळा लांबल्याने फुलशेती लागवडीला उशीर झाला असून फुलांचे उत्पन्न उशीरा सुरू होऊन दर्जेदार फुलांच्या उत्पन्नात उन्हाचे विघ्न येणार आहे. गातेस गावात जवळपास 15 शेतकरी लाखों रोपांची लागवड करीत असून फुलांच्या बाजारात मोठी उलाढाल होत. कांदा लागवड देखील या गावात मोठ्या प्रमाणावर केली जात असून अवकाळी पावसामुळे कांदा लागवड संकटात सापडली आहे.
रब्बी पिकांच्या बाबतील वाडा तालुका अग्रेसर असून वाल, मूग व हरभरा ही प्रसिद्ध आहेत.भातशेतीसह फुलांची व कडधान्य लागवड पावसामुळे संकटात सापडली असून शेतकरी मात्र चिंतेत आहेत.