ठाणे : काही इतिहास अभ्यासकांच्या विचारांनुसार ठाणे शहराचे व्यवस्थापन तब्बल 400 ते 500 वर्षांपूर्वी झाले असल्याची नोंद माध्यमांद्वारे मिळतेे. जसे ठाणे शहर जितके पौराणिक आहे. तितकेच पौराणिक ठाणे शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, वारसा जतन करणारे मंदिर, तलाव व इतर शिल्प. त्याचपैकी ठाणे शहराचे धार्मिक वारसा जतन करणारे मंदिर म्हणजे ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम इथल्या चेंदणी कोळीवाडा या भागातील गुरु श्री दत्तात्रयांचे मंदिर. कौपिनेश्वर महादेव मंदिर ज्याप्रकारे ठाणे शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते, त्याचप्रकारे या श्री दत्त मंदिराची दंतकथा प्रचलित आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचा जिर्णोद्धार आनंदी भारती महाराजांनी केले आहे.
आनंद भारती महाराज म्हणजे खुद्द अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे प्रख्यात शिष्य मानले जात असत. आनंद भारती महाराजांचे आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे कित्येक कथा आणि किस्से अनेक प्रकारे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे आनंद भारती महाराज हे स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लाडक्या शिष्यांपैकी एक होते. या दत्त मंदिरातील विश्व्ास्त हेमंत कोळी आणि जमीर कोळी यांनी आनंद भारती महाराजांची कथा पुढारीशी बोलताना कथन केली. या संदर्भात अशा अनेक दंत कथा प्रचलित आहेत.
त्यापैकी एक म्हणजे, एकदा मासेमारीसाठी समुद्रात खोलवर एक कोळी इसम आणि त्यांचे साथीदार गेले असता, अचानक भरतीमुळे समुद्राला उधाण आले. त्यांच्या जहाजात पाणी भरू लागले. पाहता-पाहता जहाज पूर्ण पाण्याने भरले. या दरम्यान इसमाला धोक्याची चाहूल झाली आणि आपल्या बरोबर इतरांचे प्राण आता जाणार, हे इसमाच्या ध्यानात आले आणि इसमाने जिवाच्या आकांताने स्वामी समर्थ महाराजांचा धावा केला.
जीवघेण्या संकटातून वाचवण्याची त्यांना प्रार्थना केली. स्वामी समर्थ महाराजांच्या सिद्ध शक्तीने ते जहाज तरले आणि क्षणांत सगळं सावरलं. खवळलेला समुद्र अचानक शांत झाला. किनाऱ्यावर येताच इसमाने आणि त्यांच्या साथीदाराने धन्यवाद केले. दुसऱ्याच दिवशी त्या इसमाला वैराग्य आले. इसम पुढे मासेमारी सोडून आध्यात्मिकतेकडे वळला. ते इसम म्हणजेच आनंद भारती महाराज पुढे आनंद भारती महाराजांच्या अक्कलकोटकडे प्रस्थान केले. आपल्या गुरुची भेट घेत गुरूंकडून दीक्षा घेतली.
मग त्यांना दिव्यानंद प्राप्त झाला व ते स्वामी नामातच रंगले व त्यादरम्यान स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पादुका आनंद भारती महाराजांस दिल्या. पुढे दत्त संप्रदायाच्या वारशाचे जतन करण्याचा आदेश दिला. आनंद भारती महाराजांनी ठाणे चेंदणी कोळीवाडा येथे 1866, साली श्री दत्त मंदिराची उभारणी औदुंबर वृक्षाखाली सहकाऱ्यांसह आनंद भारती महाराजांनी केली. 1880 साली, दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर उभारण्यात आले.
मंदिरातील कोरीव काम लक्षवेधी...
सध्या सुद्धा ते दत्त मंदिर जुन्या शिल्पात उभारल्याप्रमाणेच आहे. जुन्या सागाच्या लाकडाचे खांब आणि भाले त्यात नक्षीदार आणि कोरीव काम करून सजवलेले. दत्त भक्तांचे ठाण्यातील मुख्य आकर्षण आहे. तसेच या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव खूप उत्साहात साजरा होतो. सप्ताह म्हणजे 7 दिवस दत्त पूजा, भजन, कीर्तन, आणि इतर धार्मिक विधी या दत्त मंदिराच्या विश्वस्थांद्वारे केल्या जातात व मिळालेल्या देणगीच्या रूपाने इतर सामाजिक मदत ही घडते.