

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या विस्तारित रेल्वे स्थानकाच्या कामाला रेल्वे प्रशासनामुळेच अद्याप गती मिळू शकलेली नाही. रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी आणि स्थानकासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ठाणे महापालिकेचे युद्धपातळीवर काम सुरू असून वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. मात्र रेल्वेच्या त्यांच्या अखत्यारीत येत असलेल्या कामाला अद्याप सुरुवातच केली नसल्याने विस्तारित रेल्वे हे रेल्वे स्थानक कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेले काम जवळपास 65 टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या अखत्यारीत येत असलेल्या कामाला मात्र एवढ्या वर्षात अद्याप सुरुवात देखील झालेली नसल्याने रेल्वेनेच विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम रखडवले असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. ठाणे महापालिकेने मार्च 2026 ला त्यांच्या अखत्यारीत असलेले काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र रेल्वेकडून अद्याप कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने विस्तारित रेल्वे स्थानक नेमके कधी सुरू होणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकामधून दररोज सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करत असून संध्याकाळी तर लोकल पकडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी पकडावी लागते. ठाणे स्थानकावरील हा भार कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंडच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचे काम रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. 2018 पासून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. मात्र न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे या कामाला गती मिळू शकली नाही. सुरुवातीला या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आता ही डेडलाईन देखील हुकली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हे काम 2026 पर्यंत पूर्ण करेल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पात 3.77 एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून 10 एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 327 कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका 143 कोटी तर रेल्वेकडून 185 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 2018 साली या प्रकल्पाचा खर्च हा 263 कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये 64 कोटींची वाढ झाली असून हा खर्च 327 कोटींवर गेला आहे.
या प्रकल्पात ठाणे महापालिका स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, डेक आणि पार्किंगची सुविधा अशी कामे करणार असून हे काम जवळपास 65 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर रेल्वेकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म, रेल्वेची इमारत आणि इतर अत्यावश्यक गोष्टी बांधणार आहे. मात्र या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नसल्याने या विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम आता रेल्वेमुळेच रखडले असल्याचे आता यानिमित्ताने समोर आले आहे.
रेल्वेला पाच ते सहा स्मरणपत्रे....
विस्तारित रेल्वे स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाला ठाणे महापालिकेच्या वतीने आतापर्यंत पाच ते सहा स्मरणपत्रे देण्यात आली आहेत. नुकतेच गेल्या आठवड्यातही एक स्मरणपत्र देण्यात आले आहे. मात्र काम कधी सुरू करणार, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
या अधिवेशनात प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता...
रेल्वेकडून गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्याच आठवड्यात खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीमध्ये रेल्वे प्रशासनाची भेट घेतली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर काही प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून रेल्वेकडून कामाला लवकर सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानकाला जोडणाऱ्या 3 मार्गिका...
पहिली मार्गिका नवीन ज्ञानसाधना कॉलेज च्या मागून अप-डाऊन असणार आहेत. त्या हायवे पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.
दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.
तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.
प्रकल्पाचे फायदे...
नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत.
ठाणे स्थानकातील सुमारे 31 टक्के आणि मुलुंड स्थानकातील 21 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.
असे असेल नवीन विस्तारित रेल्वेस्थानक...
संपूर्ण ठाणे स्थानक 14.83 एकर जागेवर होणार असून त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला अधिक 2 मजली इमारत उभी राहणार आहे. हे काम रेल्वे करणार आहे.
या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.
या स्थानकात तीन पादचारी पूल असणार आहेत.
परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.
स्टेशन इमारतीसमोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे.
2.5 एकर जागेमध्ये 250 चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.