

पालघर : हनिफ शेख
सध्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल््याबाबत त्याचा वावर असल्याबाबत अनेक फोटो, माहिती, चर्चा आणि अफवा सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. मात्र विक्रमगड तालुक्यात एका मुलावर केलेला हल्ला, मोखाडा तालुक्यातील वारघड पाडा येथे दिसल्याची माहिती तसेच खोच भागात सुद्धा एका लहान मुलावर हल्ला केल्याचे दिसून आले. याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जिकडे तिकडे बिबट्या बाबतची भीती पसरली असून नेमके आताच सगळीकडे बिबट्याचा वावर का,मनुष्यवस्तीत बिबट्या का येऊ लागले असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडल्या शिवाय रहात नाही.
बिबट्या नेमका कोणत्या भागात किती आहेत याची वनविभागाकडे उपलब्ध माहिती वेगळी आणि प्रत्यक्षात अनेक गावांत बिबट्या आल्याचे फोटो काही अंशी खरे, खोटे सुद्धा यामुळे बिबट्या बाबत आता अनेक अफवा समज आणि गैरसमज सुद्धा पसरायला लागले आहेत. यामुळे याबाबतची अधिक जनजागृती व्हावी यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे शाळा महाविद्यालये बरोबरच गावागावात जावून याबाबतची जनजागृती वनविभागाचे कर्मचारी मोखाडा जव्हार विक्रमगड भागात देखील करत आहेत.
यामुळे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार बिबट्या हा तसा मांजरकुळातील प्राणी गणला जात असल्याने तो घाबरट सुद्धा आहे, मोठ्याने आवाज, उजेड बॅटरी किंवा आकाराने मोठे प्राणी माणसांना सुद्धा तो घाबरतो. दुसरीकडे त्याची उंची अडीच ते तीन फूट असल्याने त्याच्या उंचीच्या खालोखाल असलेल्या प्राण्यांवर तो भक्ष्य म्हणून हल्ला करतो. यामध्ये कुत्री, बसलेले प्राणी यांना तो लक्ष्य करतो यामुळे शक्यतो लहान मुले बसून काम करणाऱ्या माणसांवर देखील बिबट्या हल्ला करताना दिसून येतो. यामुळे ज्या भागात बिबट्याच्या वावर आहे त्या भागात लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच शेतात चार पाच माणसांमागे एक माणूस उभा असावा त्याच्या हातात काठी असावी जेणेकरुन बिबट्या हल्ला करू शकत नाही असे आवाहन देखील वनविभागाकडून करण्यात येत आहे.
बिबट्या एकाच जागी राहत नसून तो एका रात्रीत 30 ते 40 किलोमीटर अंतर चालू शकतो तसेच रात्रीत बाहेर पडणारा प्राणी असून रात्रीच्या वेळी गरज नसेल तर बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन देखील वनविभाभाकडून करण्यात येत आहे तसेच सध्या खोच भागात एक पिंजरा देखील वनविभाग मोखाडा यांच्याकडून लावण्यात आला आहे. सध्या बिबट्या मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने आताच बिबट्या शहराकडे कसे याबाबत देखील अनेकांना प्रश्न पडतो.
याबाबत एका वन अधिकाऱ्यांशी बोलल्या नंतर माहिती आली त्यानूसार सध्या जंगलात भक्ष्य कमी झालेले आहेत त्यामुळे ते कुत्र्यांच्या शोधात किंवा छोट्या पाळीव जनावरांच्या शोधात शहराकडे वळल्याचे दिसून येतात. सध्या शेतात पिके असल्याने जनावरे मोकाट सुटले जात नाही यामुळे हे जंगलात जाणाऱ्या गुरांची संख्या कमी झाल्याने भक्ष्याच्या शोधात बिबटे गावांजवळ येत आहेत त्याशिवाय मादी बिबट्या या दिवसांत प्रसूत होत असल्याने जंगलाच्या आत पिल्ले सुरक्षित ठेवणे कठीण असल्याने शक्यतो गावांच्या जवळ असलेल्या झाडीत दाट पिकांत बिबट्या येऊन राहत असल्याने सुद्धा तो या दिवसांत गावा नजीक किंवा शहरात वावरताना दिसतो.
वन विभागाकडून आवाहन
सध्या काही ठिकाणी बिबट्या दिसलेले आहेत मात्र काही फोटो ए आय च्या माध्यमातून बनवले जात असल्याने अफवांवर अंकुश ठेवणे सुद्धा अवघड जाते यामुळे असे केल्यास लोकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण पसरण्याची भिती व्यक्त होत आहे याशिवाय आता शेतीची कामे झाल्यास धान्य निघाल्यास अनेक जनावरे जंगलांच्या जवळ चरायला गेल्यास बिबट्याला भक्ष्य मिळू शकेल यामुळे शक्यतो गावात किंवा शहरात बिबट्यांचा वावर कमी होईल अशावेळी पशू पालकांना सुद्धा आवाहन आहे की बिबट्याने जनावरे नेल्यास ते नेवू द्यावे त्याची भरपाई वनविभागाकडून देण्यात येईल कारण एकदा बिबट्याने शिकार केल्यास पोटभर खाऊन तो तीन ते चार दिवस आराम करतो आणि पुन्हा ती शिकार उरली असल्यास ती खातो.यामुळे आपली जनावरे बिबट्याने जंगलात नेल्यास तत्काळ कळवावे असेही आवाहन वनविभागा कडून करण्यात आले आहे.
बिबट्यांची संख्या वाढतेय यावर तोडगा आवश्यक
बिबट्याला पकडणे किंवा मारणे यासाठी थेट केंद्रातून परवानगी लागते कारण वाघ, बिबट्या हे अन्नसाखळीतील सर्वात वरचे प्राणी आहेत तसेच अधिवासात कमी असल्याने यांचे जतन करणे आवश्यक असल्याचा नियम आहेच त्याशिवाय बिबट्या हा प्राणीमात्र शेड्युल एक मध्ये मोडत असल्याने त्याला पकडणे, मारणे यासाठी आवश्यक परवानग्या केंद्रातून घ्याव्या लागतात. मात्र साध्या बिबट्यांची वाढती संख्या पाहता बिबट्याला शेड्युल दोन मध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याचे देखील चित्र आहे. याशिवाय बिबट्या मादी ही वर्षातून दोनदा प्रसूत होते. त्यामुळे बिबट्यांची संख्या देखील वाढत असल्याने निर्बीजीकरणासारखा उपाय सुद्धा वनविभागाला शोधणे आता आवश्यक बनले आहे.