भिवंडी : विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला पाटणा येथून अटक करत तिला भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. pudhari photo
ठाणे

TET Paper Leak : आग्रा प्रिंटिंग प्रेसमधूनच टीईटीच्या प्रश्नपत्रिका लीक ?

मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणा येथून अटक

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : डी.एड. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले असून मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पटना येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ती चौथी आरोपी असून मंगळवारी तिला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस. एम. सुतार यांनी ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रश्नपत्रिका आग्रा येथील खासगी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आल्या होत्या आणि तेथूनच त्या लीक झाल्याचा संशय आहे.

डी.एड. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका विकण्यासाठी दिल्लीहून महाराष्ट्रात आलेल्या तिघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात दीड हजारांहून अधिक सहकारी छापखाने उपलब्ध असतानाही टीईटीच्या प्रश्नपत्रिका आग्रा येथील खासगी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आल्या होत्या.

याच छापखान्यातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय पोलिस तपासातून बळावला असून, तपासाची दिशा आता थेट त्या प्रिंटिंग प्रेसकडे वळली आहे. यापूर्वी भिवंडीत टीईटीच्या प्रश्नपत्रिका घेऊन दिल्ली-हरियाणाहून आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेकडे प्रश्नपत्रिका नेमक्या कुठे छापण्यात आल्या, याची माहिती मागवली. त्यावेळी आग्रा येथे प्रश्नपत्रिका छापल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तेथील छापखान्याची चौकशी सुरू केली.

तपासात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांवर सुरक्षेसाठी क्यूआर कोड छापण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रश्नपत्रिका लातूर, जालना आणि वाशिम जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार होत्या. मात्र त्या केंद्रांवर पोहोचण्यापूर्वीच पेपर फुटल्याचे समोर आल्याने प्रश्नपत्रिका छापण्यात आलेल्या ठिकाणाहूनच बाहेर काढण्यात आल्या का, याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार विजेंदर गुप्ता अद्याप फरार असून यापूर्वीही त्याचा ओडिशा टीईटी पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

विजेंदर गुप्ता आणि त्याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता यांच्यातील मोबाईल संपर्क, आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्यातील संभाव्य सहभाग यांचा तपास करण्यासाठी सरकारी अभियोक्ता अॅड सुमित जाधव यांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीच्यावतीने अॅड. शैलेश गायकवाड यांनी केवळ पती-पत्नीमध्ये संपर्क असल्याने सुमन गुप्ता आरोपी ठरत नाही, तसेच तिने पोलिसांना सहकार्य केल्याचा युक्तिवाद केला. मात्र तपासाच्या गरजा लक्षात घेऊन न्यायालयाने सुमन कुमारी गुप्ता हिला ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT