TET Paper Leak | ‘टीईटी’ पेपर फुटला; दीड कोटीला विकणार होते पेपर

आजची परीक्षा रद्द; तीन आरोपींना अटक
‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्‍या आरोपींसोबत पोलिस.
‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्‍या आरोपींसोबत पोलिस.
Published on
Updated on

ठाणे/भिवंडी : २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या ‘नीट’चे पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असताना रविवारी (दि. २८) होणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर २४ तास अगोदर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे. त्याचा फटका ६ लाख ३४ हजार परीक्षार्थी शिक्षकांना बसला आहे. याप्रकरणी चार प्रश्नपत्रिका संचांसह बिहारमधील दोन आणि हरियाणामधील एक, अशा तीन आरोपींना पोलिसांनी भिवंडीत सापळा रचून अटक केली. ते दीड कोटी रुपयांना पेपर विकणार होते. मात्र, पेपर वितरित करण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्‍या अधिक तपासाकरिता विशेष पथके राज्यभरातील विविध ठिकाणी रवाना झाली आहेत, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली.

रविवारी राज्यभरातील १ हजार २८ केंद्रांवर होणाऱ्या ‘टीईटी’ची जय्यत तयारी झाली असताना ती पेपर फुटल्याने रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. शनिवारी भिवंडी पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांना ‘टीईटी’चे पेपर विक्री करण्यासाठी भिवंडीत काहीजण आल्याची माहिती खबर्‍यामार्फत मिळाली. त्‍यानंतर डॉ. बनसोड यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पोलिस पथकाने कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावून राजीव शाव (वय ४५), आकाशकुमार सरोजकुमार (३०) या दोन बिहारी आणि हरियाणातील धीरज बलराज सिंग (२८) अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यां‍च्याकडे ‘टीईटी’चे चार प्रश्नपत्रिका संच आढळून आले.

पोलिसांनी तातडीने पुण्‍यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्‍या अधिकार्‍यांना बोलावून तपासणी केली असता, ही प्रश्नपत्रिका रविवारी (दि. २८) होणाऱ्या ‘टीईटी’चीच असल्याचे निष्पन्‍न झाले. हे आरोपी दिल्लीतून पेपर विक्रीसाठी भिवंडीत आले होते. या तिघा आरोपींपैकी धीरज बलराज सिंग हा सायन्स पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असून इतर दोघेही उच्च शिक्षित असून तिघेही आर्थिक सधन घरातील आहेत. यातील एका आरोपीने केंद्रीय विद्यालयात नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले असून दुसरा आरोपी केंद्रीय परीक्षेत नापास झालेला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशीसाठी पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस तपास पथके तयार करण्यात आली असून यामध्ये २ सहायक पोलिस आयुक्त, ९ पोलिस निरीक्षक व २० कर्मचारी असणार आहेत.

फेरपरीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी सांगितले की, राज्यात ६ लाख ३४ हजार शिक्षक रविवारी ‘टीईटी’ म्हणेज शिक्षक पात्रता परीक्षा देणार होते. या परीक्षेचे सर्व पेपर सर्व केंद्रांवर वितरित झाले होते. मात्र, पोलिसांनी पेपर फुटल्याचे उघड केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रविवारची (दि. २८) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news