Gadchiroli News | जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेशप्रकरणी नगरसेवक आशिष पिपरेला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

पाच दिवसांची पोलिस कोठडी, आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
नगरसेवक आशिष पिपरे
नगरसेवक आशिष पिपरे
Published on
Updated on

गडचिरोली : जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या कोट्यवधीच्या निधीवर डल्ला मारण्याच्या हेतूने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीने प्रशासकीय मान्यता दिल्याचे पत्र देण्यात आले होत. हे पत्र देणारा चामोर्शी नगर पंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे यास पोलिसांनी रविवारी(ता.२८) रात्री छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने पिपरे यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

२२ जूनला जिल्हा खनिकर्म कार्यालयातील राहुल रेवाडे नामक ऑपरेटरला गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक लीलाधर भरडकर यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेचा पीडीएफ आदेश प्राप्त झाला. या मान्यताप्राप्त कामांना मंजुरी मिळाली आहे काय, असे भ्ररडकर यांनी रेवाडे यांना विचारले. ऑपरेटरने 'नाही' असे उत्तर दिले. त्यानंतर हे पत्र सहायक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल राठोड यांना दाखविण्यात आले. त्यांनी प्रिंट काढून ते जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.इम्रान शेख यांना दाखवले. संबंधित पत्र बनावटअसल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी ते पत्र पोलिस अधीक्षकांना पाठवले.

त्यानंतर सहायक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल राठोड यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने पोलिसांनी अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३३७,३३८,३४०, ६२ अन्वये गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पोलिस आरोपीच्या मागावर होते.

अखेर छत्रपती संभाजीनगरमधून अटक

अखेर बनावट पत्र पाठविणारा इसम आशिष पिपरे असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी रविवारी त्यास छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. आज अटक केल्यानंतर आशिष पिपरेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास ४ जुलैपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आशिष पिपरेची पत्नी चामोर्शी नगर पंचायतीची भाजपची नगरसेविका आहे. आशिष पिपरे हासुद्धा स्वीकृत नगरसेवक आहे. एका प्रकरणात त्याच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपने त्यास दूर ठेवले होते. त्यानंतर तो काँग्रेसच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक झाला. तरीही तो भाजप नेत्यांशी जवळीच ठेवून होता. अखेर त्यास अटक करण्यात आली. सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

राजकीय दबाव न आल्यास मोठे मासे गळाला लागणार

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात कोणाकोणाशी आर्थिक व्यवहार झाले, बनावट कागदपत्रे कोणी तयार केली, मोबाईलवरुन कोणाकोणाशी संपर्क झाला अशा सर्व बाबींची पोलिस पडताळणी करीत असून,तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news