ठाणे : टीएमटी बस स्टॉप, विहीर, शौचालये गायब झाल्याचे प्रकार ठाण्यात घडले होते. आता मूर्तीसह मंदिर आणि विहीर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारण ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले 50 वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर मूर्तींसह गायब झाल्याची तक्रार पोलिस नोंदवून घेत नसल्याचे साकडे ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. दरम्यान याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी या लक्ष घालण्याची सूचना आमदार केळकर यांनी दिल्याने खरा प्रकार उजेडात येईल.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले. नवरात्रीनिमित्त 20 सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती, चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले. तर जवळील विहिरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले.
पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे केली. केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवादात मुंबईपासून बदलापूर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातूनही नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आ. केळकर यांना भेटत आहेत. घरांसाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशा अनेक विषयांसंदर्भात निवेदने प्राप्त झाली.
यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सुरज दळवी, जितेंद्र मढवी, मेघनाथ घरत, सचिन पाटील आदी उपस्थित होते.