

मुरबाड शहर : दीर्घकाळ सुरू असलेल्या पावसामुळे भातशेतीचे झालेले नुकसान सहन न झाल्याने मुरबाडच्या एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत प्राप्त माहितीवरून, रमेश गणपत देसले (वय 52 वर्षे) असे जीवन संपवलेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो मुरबाड तालुक्यातील जायगाव येथील राहणार आहे. हातातोंडाशी आलेली भातपिके सततच्या अतिवृष्टीमुळे होत्याची नव्हती झाल्याने शेतकरी देसले यांनी (दि. 5 रोजी) टोकाचे पाऊल उचलून थेट कीटकनाशक प्राशन केले. त्यांना उपचारासाठी शहापूर येथील रुग्णालयात दाखल केला असता उपचारा दरम्यान रविवारी सायंकाळी उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रमेश देसले यांच्या पत्नीचे नुकतेच ऑपरेशन झाले असून मागील वर्षी मुलाचे लग्न ही पार पडले. यासर्वात आर्थिक नियोजनासाठी ते पूर्णपणे आपल्या शेतकीवर अवलंबून असतांना पावसाच्या कहरने त्यांच्या भातपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. परिणामी हतबल झालेल्या शेतकरी देसले यांनी थेट जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती गेल्याने देसले कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
यापूर्वी शेलशेत येथील अशोक शंकर देसले या शेतकऱ्याने तत्कालीन मुरबाड तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील व नायब तहसीलदार अजय पाटील यांच्या लाचखोरपणाला कंटाळून तहसील कार्यालयावरून उडी मारून जीवन संपवल्याचा प्रकार चर्चेत आला होता. तर आता जायगावचे रमेश देसले या शेतकऱ्याच्या जीवन संपवण्यामुळे मुरबाड तालुक्यात शेतकरी जीवन संपवण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.