

ठाणे : घोडबंदर भागातील आनंद नगर भागात असलेल्या जुन्या स्वामी समर्थांच्या मठाच्या जागी गार्डन उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे येथील मठावर कारवाई केली जाणार असल्याच्या भितीने सोमवारी येथील रहिवाशांनी महाविकास विकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी शेकडो भक्तांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर स्वामींचा जप केला. जवळ जवळ दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मी असे पर्यंत मठावर कारवाई होणार नसल्याचा शब्द दिला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
आनंद नगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. सुमारे 19 वर्षांपासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील आठवड्यात हा मठ जमीनदोस्त करण्यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी गेले होते. त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठविले होते. शिवाय, अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामीभक्त म्हणून आपण कारवाईविरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे स्वामीभक्तांनी पालिकेवर धडक दिली. पालिका आयुक्तांनी भेट द्यावी, यासाठी दालनाबाहेरच स्वामी नामाचा जप सुरू केला. अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले.
मठावरील कारवाई स्थगित
याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की, स्वामींच्या कृपेमुळे आयुक्तांनी मठावरील कारवाई स्थगित केली आहे. मात्र मठाची ही जागा मठाच्या नावे कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय, मठ जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे करू, असा इशारा दिला. तर, प्रताप सरनाईक यांनी आपला हट्ट सोडावा स्वामींचा रोष पदरात पाडून घेऊ नये, अशी प्रतिक्रिया मनसेच्या वतीने देण्यात आली.