लॅपटॉप, मोबाईलच्या अधीनतेमुळे मानदुखी, कंबरदुखी वाढली  pudhari photo
ठाणे

Laptop Mobile Addiction : लॅपटॉप, मोबाईलच्या अधीनतेमुळे मानदुखी, कंबरदुखी वाढली

जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी विभागात रुग्णसंख्या वाढली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य झालंय. पण या स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात येणाऱ्या तब्बल 50 टक्के रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे. चुकीची आसनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातो.

या तक्रारींवर रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचारपद्धतीने उपचार केले जातात. विभागात दररोज साधारण 50 रुग्ण उपचारासाठी येत असून, या पैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम-थंड शेक, चुंबकीय, विद्युत, ध्वनीलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातो. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते.

“योग्य आसनशैली, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास मणक्यांच्या शस्त्रक्रिया टाळता येतात. आजच्या तरुण पिढीने शरीराचे सिग्नल ओळखून वेळेवर सावध झाले पाहिजे.”आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि डी युक्त अन्न, दररोजचा हलका व्यायाम, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे, योग्य खुर्चीचा वापर, स्क्रीन नजरेच्या समांतर ठेवणे आणि वजन उचलताना गुडघे वाकवणे हे सोपे पण प्रभावी नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

ही आहेत लक्षणे

तासनतास संगणक वा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहिल्याने मान आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी मानेत वेदना, चक्कर येणे, हातात मुंग्या येणे, अशक्तपणा, तर काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणे दिसतात. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कंबरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा आढळतात.

“शरीराची योग्य काळजी घेणे हेच खरे औषध आहे.” मोबाईल आणि लॅपटॉपच्या युगात शरीराचा ‌‘नेटवर्क‌’ही कायम जोडलेला राहावा, यासाठी आता प्रत्येकाने थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं झालंय.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक, ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT