

मुंबई : मुंबई पोलिसांना आणखी एक ड्रग्ज विक्री करणारी साखळी उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे छापा टाकून एम.डी (मेफेड्रोन) निर्मिती कारखान्यावर छापा टाकून 13 कोटी 44 लाख 53 हजार 700 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असून आतापर्यंत पाच जणांना टोळीला अटक केली आहे. वर्षभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.
सोहेल अब्दुल रौफ खान, मेहताब शेरअली खान, इक्बाल बिलाल शेख, मोहसीन कय्युम सय्यद आणि आयुबअली आबूबकर सिद्धीकी या पाच जणांना अटक केली असून ते सर्वजण पनवेल, घाटकोपर, गोवंडीचे रहिवाशी आहेत. ही टोळी येथील रशिद कंपाऊंडमध्ये एमडी ड्रग्ज बनवून त्याची मुंबईत सर्वत्र विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका ड्रग्ज पेडलरला टिळकनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून 57.84 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. चौकशीत साथीदारांनी दिल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर पथकाने मुंबईसह मिरारोड येथे कारवाई करुन त्याच्या साथीदारांना एमडी ड्रग्जसह अटक केली होती.
या चौघांच्या चौकशीत नालासोपारा येथे एक एमडी ड्रग्जचा कारखाना असून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज बनविले जातात अशी माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, एसीपी आबूराव सोनावणे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा कुलकर्णी यांच्या पथकातील एपीआय मैत्रानंद खंदारे, विलास पवार, उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, सुशांत साळवी, अजय गोल्हर, पोलीस अंमलदार राणे, आखाडे, भिलारे, सावंत, उपाध्याय, दिवटे, पुंजारी, केदार, भिसे, झिणे, राऊत, सानप, नागरगोजे, काटकर आदींनी नालासोपारा येथील पेल्हार, भावखळ, खैरपाडाच्या रशीद कंपाऊडमधील एमडी ड्रग्ज कारखान्यात छापा टाकला.
यावेळी तिथे एमडी ड्रग्ज उत्पादन करणाऱ्या अन्य एका आरोपीस पोलिसांनी अटक केली. या कारखान्यातून पोलिसांनी 6 किलो 675 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणसाठी साहित्य असा 13 कोटी 38 लाख 53 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणारे चार तर उत्पादन करणारा एक अशा पाच जणांना अटक केली. अटक आरोपींपैकी सोहेल हा घाटकोपर, मेहताब, इक्बाल आणि मोहसीन हे तिघेही गोवंडी तर आयुबअली हा पनवेल परिसरात राहतो. या पाचजणांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
इतर आरोपींचा शोध सुरू
एमडी ड्रग्ज बनविणारी ही एक टोळी असून या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज बनवून त्याची मुंबईसह आसपासच्या शहरात विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.
2025 वर्षातील ड्रॅग्ज कारवाया
जुलै : कर्नाटकच्या म्हैसूर शहरातील कारखान्याचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. 381 कोटी 94 लाख रुपयांचा 187 किलो 97 लाखांचे एमडी ड्रग्जसह 281 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. चार आरोपींना अटक केली होती.
एप्रिल : वसईतील कारखान्यातून साकीनाका पोलिसांनी आठ कोटीचे एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त केले होते. तीन आरोपींना अटक केली होती.
2024
सप्टेंबर : बदलापूर येथील कारवाईत एका उच्चशिक्षित तरुणासह चार आरोपींना अटक केली. 33 लाख 60 हजाराचा एमडी ड्रग्जसह सुमारे 82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मार्च : सांगलीतील महाकाल येथील कारखान्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करीत एका टोळीला अटक केली. 252 कोटी 28 लाख रुपयांचे 126 किलो 141 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले.
2023
ऑक्टोबर : खार येथे दोघांकडून दहा कोटींचे पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यांच्या चौकशीतून सोलापूर येथील चिंचोली, एमआयडीसी कारवाई केली होती. सुमारे शंभर कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
ऑक्टोबर : नाशिक येथून बारा आरोपींना अटक करीत 151 किलो 305 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. त्याची किंमत 300 कोटी 26 लाख 10 हजार इतकी होती.