

टिटवाळा : गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा पूर्व-पश्चिम भाग, इंदिरानगर, सरनोबत नगर, मांडा कोळीवाडा, माउली कृपा सोसायटी आणि जानकी विद्यालय परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळातून एक थेंबही पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.
या संदर्भात संपर्क साधला असता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले की, “प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आल्याने पाणीपुरवठा साधनांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे काही भागातील पुरवठा थांबवावा लागला. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, दुपारनंतर पुरवठा सुरळीत होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, बारवे आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रांमधील रॉ वॉटर चॅनलमध्ये गाळ साचल्यामुळे तसेच विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीकरिता मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या शटडाउनमुळे कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण (ग्रामीण) तसेच वडवली, शहाड आणि टिटवाळा परिसरातील पुरवठा ठप्प राहणार होता. मात्र नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिकेने अखेर नियोजित शटडाउन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या तांत्रिक पथकांनी तातडीने कामाला सुरुवात केली असून, गाळ आणि कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. “लवकरच पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने पूर्ववत होईल,” असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.