Bhiwandi Teacher Arrested for Bribe
भिंवडी : भिवंडी शहरातील रईस उर्दू हायस्कूलच्या शिपायाचे सर्व्हिस बुक हरवल्याने ते नव्याने डुप्लीकेट बनवून देण्यासाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरूवारी (दि. १) करण्यात आली. शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना (वय ५४) आणि मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी (वय ५२) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरात कोकण मुस्लिम सोसायटी संचलित रईस उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असून या ठिकाणी काम करणाऱ्या शिपायाचे सर्व्हिस बुक गहाळ झाल्याने ते नव्याने डुप्लीकेट बनवून देण्यासाठी व त्यावर वेतन आयोगा कडील नोंदी व शिक्के घेऊन देण्यासाठी शाळेतील शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना, मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत शिपाई यांनी १९ मार्चरोजी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर २० व २१ मार्चरोजी प्रत्यक्ष केलेल्या पडताळणीत शिक्षक शहाजान मौलाना यांनी ५० हजार लाचेची मागणी केली. तर मुख्याध्यापक जियाउर रहमान अन्सारी यांनी त्यास दुजारा देऊन लाचेची रक्कम देण्यास तक्रारदार शिपायास प्रोत्साहीत केले होते.
दरम्यान शिक्षक शहाजान मौलाना यांनी ३० एप्रिल रोजी शिपायास कार्यालयात बोलावून लाचेची रक्कम ५० हजार तसेच सर्व्हिस बुक मधील नोंदी घेण्यासाठी खासगी टायपीस्ट यांच्यासाठी ५ हजार व वेतना आयोगानुसार सर्व्हिस बुकवर शिक्के मारुन देण्याकरीता ५ हजार असे एकूण ६० हजार रुपयांची मागणी करीत 1 मे रोजी पैसे घेऊन येण्यास सांगितले.
महाराष्ट्रदिनी १ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने शाळेत सापळा रचला. तेथे पंचा समक्ष शिक्षक शहाजान मौलाना यांनी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडले. तर मुख्याध्यापक जियाउर रहमान अन्सारी यांना सुद्धा या गुन्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिवंडी शहरातील शाळेत केलेल्या कारवाईनंतर शहरातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.