

भिवंडी (ठाणे) : पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांसह स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अवैधपणे भारतात वास्तव्य करणार्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरूच आहे.
भारताचे अधिकृत नागरिक नसताना तसेच भारतात येण्यासाठी पारपत्र,अधिकृत व्हिसा नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येवून भिवंडीत वास्तव्य करणार्या चार बांगलादेशी नागरिकांना भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळच्या अखत्यारीतील 3 पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यामध्ये 3 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे.
विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वच दोन पाकिस्तानी नागरिक असलेल्या हारून आणि अस्लम हे दोघे भिवंडीत वास्तव्यास असल्याचे समोर आले होते.हे दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याचे माहीत असतानाही 7 आरोपींनी त्यांना बनावट ओळखपत्र, व इतर कागदपत्र बनवुन देवून अवैधरित्या हारून व अस्लमला भारतात प्रवेश करुन देवुन भारताचे सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. तर सोमवारच्या (दि.28) कारवाईत आसिफ आतिक शेख (24),मोहम्मद आलीम अमजद खान (40), यासमीन मोहमंद सोफी शेख (33), शरीफुल गुलाम शेख (41) अशी अटक केलेल्या नागरिकांची नावे आहे.
पहिल्या घटनेत आसिफ आणि मोहम्मद या दोघांकडे भारतात येण्यासाठी पारपत्र किंवा अधिकृत व्हिझा नसतांना तसेच कोणताही परवाना नसतांना पैसे कमविण्यासाठी बांग्लादेशातुन छुप्या मार्गाने भारतीय सिमेत सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून जंगलातुन भारतात प्रवेश करून हावडा येथून ट्रेनने कल्याण व त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्य करीत आढळून आल्याने शांतीनगर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून 5 हजार रुपये किमतीचा टेक्नो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे.दुसर्या घटनेत यासमीन शेख ही महिला कोनगाव परिसरातील रांजनोली ब्रीज खाली संभा पॅलेस समोर या ठिकाणी 28 एप्रिल रोजी मिळून आल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती बांगलादेशातून भारतात येवून भिवंडी तालुक्यातील राहनाळ गाव हद्दीतील चरणी पाड्यातील चामुंडा अपार्टमेंट मध्ये भाडे तत्वावर राहत असल्याचे समोर आल्याने यासमीनच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून तर तिसर्या घटनेत शरीफुलला नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
खळबळजनक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठाणे जिह्यात ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ साहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या 3 पदाधिकार्याना भिवंडी शहरातून ठाणे एटीएसच्या अधिकार्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून इसीसच्या सहा दहशतवाद्यांना काही महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. एकंदरीतच ठाणे जिल्ह्यास मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे.