Tansa Wildlife Sanctuary Pudhari
ठाणे

Tansa Wildlife Sanctuary: तानसाच्या जंगलाला संरक्षणाचे कवच; बिबट्या, भेकरांसह २०० हून अधिक पक्षीप्रजातींचा अधिवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय; वन्यजीवांचा अधिवास आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

अमोल देशपांडे

ठाणे: मुंबई महानगराची तहान भागविणाऱ्या तानसा जलाशयाच्या परिसराला निसर्गाने वनसंपदा आणि जैवविविधतेचा अनमोल ठेवा बहाल केला आहे.

घनदाट जंगल, नैसर्गिक पाणवठे, विविध पक्ष्यांचा किलबिलाट आणि बिबट्या, सांबर, भेकर यांसारख्या वन्यजीवांचा अधिवास यामुळे तानसा वनक्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सहा गावांतील ५८८.७६७ हेक्टर महसुली व खासगी क्षेत्राचा विस्तारित अभयारण्यात समावेश करण्याच्या प्रस्तावाला राज्य वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे.

वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राखण्याबरोबरच जंगल आणि जलस्रोतांशी जोडलेले पर्यावरणीय संतुलन जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २६ व्या बैठकीत विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

वनमंत्री गणेश नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. तानसा वन्यजीव अभयारण्याच्या परिसरातील मौजे ओगदा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या सहा गावांतील एकूण ५८८.७६७ हेक्टर महसुली व खासगी क्षेत्राचा विस्तारित अभयारण्यात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली.

जंगलातील वृक्षसंपदा मातीची धूप कमी करण्यास, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास आणि जलस्रोतांचे पर्यावरणीय संतुलन टिकविण्यास हातभार लावते. त्यामुळे तानसा जंगलाचे संरक्षण म्हणजे केवळ वन्यप्राण्यांचे संवर्धन नव्हे, तर जलस्रोतांशी निगडित नैसर्गिक व्यवस्थेचे जतनही होय.

तानसा परिसरात २०० हून अधिक पक्षीप्रजाती आढळत असल्याची माहिती दिली जाते. तानसा जंगलाची ओळख केवळ घनदाट वनराईपुरती मर्यादित नाही. बिबट्या हा या परिसरातील प्रमुख शिकारी वन्यजीव असून सांबर, चितळ, भेकर, रानडुक्कर, कोल्हा, तरस आणि मुंगूस यांसारखे प्राणीही येथील वनपरिसंस्थेचा भाग आहेत.

रानमांजरांच्या विविध प्रजाती, लहान भारतीय उदमांजर, सामान्य उदमांजर आणि पिसोरी यांसारख्या वन्यजीवांच्या अधिवासासाठीही या परिसरातील जंगल महत्त्वाचे आहे.

पर्यावरणीय क्षेत्राचेही महत्त्व

अभयारण्याच्या सभोवतालचा परिसर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून निश्चित करण्यामागे वन्यजीवांच्या अधिवासावर होणारा बाह्य हस्तक्षेप नियंत्रित करणे हा प्रमुख उद्देश असतो. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात प्रत्येक बांधकाम किंवा मानवी कृतीवर सरसकट बंदी असते, असे नाही.

२०० हून अधिक पक्षीप्रजातींचा निसर्गसोहळा

तानसा परिसरातील जलाशय, ओढे, नाले, पाणथळ जागा आणि घनदाट वृक्षराजी यांमुळे विविध पक्ष्यांना अनुकूल अधिवास मिळतो. येथे निवासी तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात.

मोर, कोतवाल, सुतारपक्षी, सूर्यपक्षी, घुबडांच्या विविध प्रजाती, बगळे, पाणकावळे, सर्पपक्षी, बदके आणि शिकारी पक्ष्यांमुळे या परिसरातील पक्षिवैविध्य समृद्ध झाले आहे. तानसा परिसरात २०० हून अधिक पक्षीप्रजाती आढळत असल्याची माहिती दिली जाते.

सर्पगरुड, ब्राह्मणी घार, काळी घार आणि शिक्रा यांसारखे शिकारी पक्षी नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहेत. पक्ष्यांचे अस्तित्व जलस्रोत आणि त्यांच्याशी निगडित जैविक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करते. दुर्मीळ रानपिंगळ्यासारख्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठीही जंगलातील नैसर्गिक अधिवास जपणे आवश्यक आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT