ठाणे: ठाण्यातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या 'संस्कृतीची दहीहंडी' कार्यक्रमात अभिनेता सुनील शेट्टीने अस्खलित मराठीत, जमलेल्या गोविंदांशी संवाद साधला.
अभिनेता सुनील शेट्टी म्हणाले, 'मुंबईत रहायचे तर मराठी बोलावेच लागणार ना... कसे नाही बोलणार? सर्वांना खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद, असे सुनील शेट्टी म्हणाला आणि त्याच्या मराठीचे दणक्यात स्वागत झाले.
ठाणेकरांनो मैं तुम्हे भूल जाऊ ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नही दूंगा हा डायलॉग मराठीत म्हणत त्याने सर्वांची मने जिंकली. मी वर्षानुवर्ष या ठिकाणी येतो, खूप प्रेम मिळते.
दिघे साहेबांचे नाव वर्षानुवर्ष चालत आले असल्याचे त्याने सांगितले. ड्रग्ज आणि कोणती नशा करू नका, असे आवाहन गोविंदा पथकांना करत एकत्र राहिलात तर वर जाऊ शकता असा सल्ला सुनील शेट्टीने दिला.
कलाकारांनी भरला उत्साह
अभिनेते सुनील शेट्टी, गोविंदा, सिद्धार्थ जाधव, दत्तू मोरे, नम्रता संभेराव असे अनेक कलाकार या गोविंदा उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांची विशेष उपस्थिती हे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरले. गोविंदाच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये उत्साह संचारला. संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दणाणून गेला.
दरम्यान, अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीने उत्सवाला मनोरंजनाचीही रंगत आली. गोविंदा यांनी आपल्या लोकप्रिय नृत्यशैलीची झलक दाखवत उपस्थितांची मने जिंकली. ‘किसी डिस्को में जाए’ या गाण्यावर त्यांनी थिरकताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला. गोविंदाच्या नृत्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.