

मुंबई: सलग लागून आलेली सुट्टी तसेच दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी शहरात काही वळणे आणि रस्त्यांवर लावलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी शनिवारी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
त्यात गोविंदा पथकांच्या उंच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी शहरातील लहान मोठे रस्ते अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते. परिणामी, दादर, लालबाग, गिरगाव, वांद्रे, घाटकोपर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती. अशा वाहनकोंडीचा सामना करत वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. त्यात नागरिकांचेही हाल झाले.
दहीहंडी उत्सवानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची संभाव्य गर्दी लक्षात घेत वाहनांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांकडून काही निर्बंध आणि सूचना जाहीर केल्या होत्या. मात्र, काही वाहन चालकांकडून या सूचना पाळल्या जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनकोंडीचे प्रकार दिसून आले.
घाटकोपर (पश्चिम) येथे होणाऱ्या मोठ्या दहीहंडी उत्सवासाठी सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत काही ठिकाणी वाहनांसाठी बंदी होती. त्याचा फटका अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला. वांद्रे पश्चिम येथेही संध्यकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत जरीमरी रोडवर वाहतूक निर्बंध होते. त्यामुळे एस.व्ही. रोड विठ्ठल मंदिर सिग्नलजवळ प्रचंड गर्दी होती.
दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक, शिवाजी पार्क, लालबाग, करी रोड येथे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. करी रोड पूल आणि चिंचपोकळी पुलावरून वाहतूक वळविण्यात आली होती. तसेच गिरगाव, काळबादेवी, भुलेश्वर आणि मशीद बंदर या परिसरांमध्ये वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
काळबादेवी मेट्रो स्थानकासमोरुन पुढे मुंबई स्थानकांपर्यत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि जिथे लोकांची मोठी गर्दी असेल असे रस्ते टाळावेत, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला होता. मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी वाहनांची ये-जा अनियंत्रित झाल्याने शहरात जागोजागी वाहतूक कोंडी दिसून आली.