शहापुरात मोकाट गुरांचा विषय चिंताजनक pudhari photo
ठाणे

Shahapur stray cattle issue : शहापुरात मोकाट गुरांचा विषय चिंताजनक

मालकांचा बेजबाबदारपणा बेततोय जनावरांच्या जीवावर

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : राजेश जागरे

तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर व माळ रानांवर मोकाट फिरणाऱ्या बैल, गायी-वासरू व म्हशींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, हा प्रकार आता गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. रस्त्यावर कळपाने फिरणारे पशुधन वाहतुकीस अडथळा ठरत असून, अपघातांना खुले आमंत्रण देत आहे.

ग्रामीण भागात तसेच शहरालगतच्या रस्त्यांवर जनावरे मोकाट सोडली जात असल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळी व संध्याकाळच्या वेळेस ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली किंवा चालत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून अनेकवेळा वाहन चालक व जनावरे जखमी होण्याचे व मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. यामागे पशुधन मालकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे असंख्य नागरिकांचे म्हणणे आहे.

जनावरांची योग्य व्यवस्था न करता त्यांना मोकाट सोडणे म्हणजे त्या जनावरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अनेकदा वेगाने येणाऱ्या वाहनांच्या धडकेत गायी-वासरे, म्हैशी गंभीर जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यूही होतो. याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. मोकाट जनावरांवर कारवाई, दंडात्मक उपाय, गोठ्यांची व्यवस्था तसेच पशुधन मालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. दरम्यान, “जनावरांची काळजी घेणे हे मालकांचे कर्तव्य असून त्यांच्या निष्काळजी- पणामुळे निरपराध जीव धोक्यात येऊ नयेत,” अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे. प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जनावरे तस्कर सक्रीय...

मोकाट जनावरांचा गैरफायदा घेत जनावरे चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर, शेतशिवारात किंवा गावालगत मोकाट फिरणारी गाय, बैल, म्हैशी व वासरे चोरट्यांचे सहज लक्ष्य ठरत आहेत. अनेक गावांमध्ये शेती उपयोगात नसल्याने किंवा खर्च परवडत नसल्याने काही शेतकरी आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. मात्र, याच निष्काळजीपणाचा फायदा चोरट्या टोळ्या घेत असून, वाहनांद्वारे जनावरे उचलून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. मोकाट जनावरांची टेहळनी करून चोरांनी गुरांना गुंगीचे इंजेक्शन मारून पळवल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. पशुधन मालकांनी वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, जनावर चोरीचे प्रकार गंभीर स्वरूप धारण करतील, अशी चिंता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT