माऊली pudhari photo
ठाणे

माऊली

भगवंता तुला शोधू कुठे?

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

चित्त शुद्धी हेच आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे मुख्य ध्येय असायलाच हवे. वारकरी संप्रदायाचा गाभा हाच आहे. भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्याच्या माध्यमातून एक चित्त शुद्धी प्राप्त केली की, भगवंत तिथेच कर कटेवर ठेवून उभा आहे. साधकांची आणि भक्तांची भगवंताप्रती असलेली ओढ, त्याला ज्या मार्गाने त्याच्याकडे घेऊ न जायला हवी तो मार्ग माऊलींनी दाखवला. पुरुषोत्तम योगात भगवंताने तो कोठे कोठे वसतो याचा उल्लेख केला आहे; याचे भावगर्भ निरूपण आजच्या लेखात.

॥ श्री ॥

अफाट आणि अनंत पसरलेल्या विश्वाला उत्पत्तीपूर्वी आणि उत्पत्तीनंतर दाखवणारा ‌‘प्रकाश‌’ हा मीच आहे, असे भगवंत श्रीकृष्ण म्हणतात. अनंत तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, नक्षत्रे अर्थात ‌‘ब्रह्मांडास‌’ जो प्रकाशमान करतो ती शक्ती किंवा दिव्य प्रकाश म्हणजे मीच, माझ्यामुळे निर्माण झालेले दिव्य तेज आहे. चंद्राचे शीतल चांदणे आणि सूर्याचे प्रखर तेज माझ्यामुळेच आहे. ज्वलनशील इंधनामधील अग्नी आणि अन्नाचे पचन करणारा जठराग्नी यातसुद्धा माझ्याच प्रकाशाचे आणि अग्निरूपाचे स्वरूप आहे.

तरी सूर्यासकट आघवी|

हे विश्वरचना जे दावी|

ते दिप्ती (तेज) माझी जाणावी|

आदयंती (आदि आणि अंती) आहे ॥

मी पृथ्वीला आधारभूत, मातीच्या कणात, सागराच्या जळात, मी स्थावरात, मी जंगमात, मी भूतमात्रात भरून आहे. आकाशातील हजारो चंद्रांचे मी सरोवर, त्यामधून निर्माण होणाऱ्या निळ्याशार प्रकाशात मीच आहे. धान्यदिकांचे पोषण माझ्यामुळेच, त्यातून निर्माण होणारी समृद्धी आणि प्राणीमात्रांच्या पालन-पोषणात मीच आहे.

मी प्राण-अपान स्वरूपात येऊ न अन्न पचवतो. मीच सर्व ‌‘जन‌’ आहे, जनांना जगवणाराही मीच आहे. या संपूर्ण विश्वात मीच भरून राहिलेलो आहे; यात तीळमात्र शंका नाही. प्राण्यांमधील किंवा जीवामधील राजस-तामस-सात्विक बुद्धीप्रमाणे त्यांना मी वेगवेगळा भासतो. ज्याप्रमाणे आकाशाचा ध्वनिरूप शब्द एकच आहे; परंतु विविध प्रकारच्या विशेष वाद्यांतून निरनिराळ्या नादांद्वारे तो बाहेर पडतो. किंवा उगवलेला सूर्य एकच आहे; परंतु त्याच्या प्रकाशात अनंत प्रकारच्या गोष्टी घडत असतात. पुरुष (जीव) ज्या प्रकारचे रज-तम-सत्व गुण धारण करतो त्याप्रकारचे भगवंत स्वरूप दर्शन त्याला त्या-त्या विचाराप्रत आकर्षित करते.

इथे माऊली त्रिगुणांमधील धारण क्षमतेला प्राधान्य देतात. आपणच काय, या विश्वातील प्रत्येक जड-जीव हा त्रिगुणांनी भारांकीत आहे. यामधील कोणत्या गुणांस तुम्ही अधिक समृद्ध करता यावर तुमच्या-माझ्या जीवित कर्माची दिशा ठरणार आहे.

गुणांची निवड हीच महत्त्वाची ठरते. गुणांच्या निवडीतून तुम्हाला कर्माचा मार्ग दृष्टीस पडणार आहे. कर्माच्या माध्यमामधूनच पाप-पुण्याचा संचय किंवा निष्काम कर्माची उपासना आपल्या हातून घडणार आहे. आता आपल्या कर्माच्या माध्यमातून जे तीन पर्याय समोर उभे राहणार आहेत; तेच तुमचं सुकृत आहे. तोच तुमचा माझा संचय किंवा साठा. पाप संचयातून मृत्यूलोक आणि दुःख भोग; पुण्य संचयातून स्वर्ग लोक आणि सुख उपभोग, निष्काम कर्मातून मुक्ती. आता लक्षात येणारच येणार. जे कराल तेच पदरात पडणार आहे.

माऊली मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत तुम्हा आम्हाला आमच्या पसंतीचाच मार्ग आम्ही स्वीकारावा म्हणून मार्गदर्शक बनतात. इथे कोणाचे पाय धरून मुक्ती, पाप-पुण्य मिळणार नाही, तर रज-तम-सत्व गुणांपैकी आम्ही कोणता गुण स्वीकारतो त्या आधारावर आमचा जीवित मार्ग आम्हीच स्वीकारणार आहोत. म्हणूनच माऊली अभंगातून उपदेशही करतात.

आपली आपण करा सोडवण|

संसार बंधन तोडा वेगी॥

संसार याचा अर्थ लेकर-बाळ, बाबा-आई, आप्तस्वकीय, इष्ट-मित्र असा नाही. संसार याचा अर्थ ज्या ‌‘कामेच्छा‌’मुळे तुमचे-माझे हृदय शुद्ध होत नाही त्यांचा त्याग करणं रज-तम-सत्वामधून फक्त विशुद्ध सत्वाची निवड करून जीवन जगत शेवटी सत्वांचाही त्याग करणे निष्काम कर्ममार्गाच्या माध्यमातून सृष्टीची सेवा करणे, सर्वांना सोबत घेऊन संसारात सुख निर्माण करणे यासाठीच माऊलींनी ‌‘तत्त्वज्ञान‌’ मांडून प्रबोधन केले.

अवघाची संसार सुखाचा करीन|

आनंदे भरीन तिन्हीलोक॥

भगवंताला गुणांद्वारे आलिंगण देत, निर्गुण निराकाराला सृष्टीच्या सृजनांत शोधण्यासाठी आध्यात्मिक तत्त्वज्ञान माऊलींनी मांडलं आहे. त्याचा स्वाद घेत भगवंताचं दर्शन घेऊ यात.

रामकृष्णहरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT