Kalyan illegal construction case Pudhari
ठाणे

Kalyan illegal construction case: सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या? विश्वनंदा सोसायटीतील बांधकामांवरून वाद

केडीएमसी अधिकाऱ्यांवरही आरोप

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बिर्ला कॉलेज समोरील विश्वनंदा सोसायटी परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत हॉटेल व्यवसायाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते, तथा ‌‘पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था‌’ चे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात काही अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांसह केडीएमसी मधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आल्याने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनंदा सोसायटी हा पूर्णपणे निवासी परिसर असून गेल्या दोन वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हॉटेलमधून निघणारे उरलेले तेल, चिकन-मटणाची हाडे, खराब अन्नपदार्थ आणि इतर घातक कचरा थेट ड्रेनेज लाईनमध्ये टाकला जात असल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्था वारंवार चोकअप होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी अनेक घरांमध्ये संडासाचे सांडपाणी घुसत असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते गोविंद प्रजापती यांनी सातत्याने केडीएमसी प्रशासनाकडे लेखी तक्रारी करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. अनधिकृत बांधकामे आणि हॉटेल व्यवसायाविरोधात कारवाई व्हावी यासाठी त्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर काही अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याचाच राग धरून काही संबंधितांनी प्रजापती यांना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

16 मे रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रामदास गावडे नावाच्या व्यक्तीने दारूच्या नशेत 10 ते 12 युवकांना एकत्र करत गोविंद प्रजापती यांच्या घराबाहेर गोंधळ घातल्याचा आरोप आहे. फोन करून ‌‘घरातून बाहेर ये‌’ असे म्हणत मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच प्रजापती यांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली.

माहितीनुसार, पोलिस काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिस येताच संबंधितांनी गर्दी पांगवली. तरीदेखील पोलिसांसमोरच हातवारे करून धमक्या देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

गोविंद प्रजापती यांनी लवकरच केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सविस्तर तक्रार सादर करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या गंभीर आरोपांनंतर आता केडीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी कोणती भूमिका घेणार, तसेच अनधिकृत बांधकामे आणि धमकीप्रकरणी कोणावर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT